X
X

धर्मा पाटील यांची विधवा पत्नी नजरकैदेत , सरकारला एवढी मस्ती का?-अजित पवार

अजित पवार यांचा युती सरकारवर निशाणा

शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पार पडावी म्हणून धर्मी पाटील यांच्या विधवा पत्नीला नजरकैदेत ठेवले गेले. सरकारला ही कसली मस्ती आली आहे? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला आहे. गंगाखेडमधील सभेत बोलताना त्यांनी सरकारला धारेवर धरले.  सत्ता येते – जाते हेही लक्षात घ्या असा निर्वाणीचा इशाराही सरकारला दिला.

राज्यातील शिक्षकांनी आज आपले अवयव विकायला काढले आहेत हे काय चाललंय राज्यात असा सवाल करतानाच अशा घटनांची जबाबदारी कुणाची आहे. ही सरकारची जबाबदारी नाही का? असेही अजित पवारांनी विचारले आहे.  भाजपा-शिवसेनेच्या दळभद्री सरकारमुळे राज्यात लोक जीव देऊ लागले आहेत. महाजनादेश यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना लोक जीव देत आहेत हे दिसत नाही का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

मराठवाड्यावर युती सरकारने सर्वात जास्त अन्याय केला आहे. या अन्यायाचा विचार आता मराठवाड्यातल्या जनतेने केला पाहिजे असंही आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले. अंमली पदार्थाचे सेवन महाराष्ट्रात वाढले आहे हे कशाचे द्योतक आहे तर वाढलेली बेरोजगारी आहे. डान्सबार बंदी आमच्या आबांनी केली होती परंतु या सरकारने हे डान्सबार पुन्हा सुरु केले. युवा पिढी वाया घालवण्याचे काम हे सरकार करते आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला.  रात्र वै-याची आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. परंतु सरकारचे जे काही चालले आहे. ते जनतेसमोर आणण्याची आमची जबाबदारी आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

 

 

 

 

21
Just Now!
X