गुजरात आणि हिमाचल निवडणुकांचे कल आणि निकाल सकाळपासूनच समोर येत आहेत. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता येणार हे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. मात्र महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भाजपवर शरसंधान केले आहे. ‘आम्ही म्हणतो ती पूर्व दिशा’ असे म्हणणाऱ्यांना चपराक बसली आहे असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल असे दावे केले जात होते मात्र तसे होत नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.

हिमाचल आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने प्रचारासाठी आणि विजयासाठी जोर लावला होता. ज्याप्रकारे गुजरातवर लक्ष केंद्रीत केले होते त्यावरून तर ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी सभा घेत काँग्रेसवर आरोप-प्रत्यारोप केले होते. मात्र जसजसे कल येत गेले तस तसे काँग्रेसने चांगली लढत दिली. सत्ता भाजपचीच येणार आहे तरीही दोन्ही पक्षांमध्ये अपेक्षित लढत बघायला मिळाली. याचमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.