पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चार चाकी वाहनाचे उदघाटन विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून कशा प्रकारे परीक्षण केले जाणार आहे, याची अजित पवार माहिती घेत होते. त्या दरम्यान माहिती देणार्‍या कर्मचाऱ्याने माहिती सांगताना मास्क खाली घेतला होता. ते बघून, ए मास्क वर घेऊन बोल, असा वरच्या आवाजात पवारांनी त्याला दम भरला.

जगभरात करोना विषाणू आजाराने मागील आठ महिन्यांपासून थैमान घातले आहे. हा आजार होऊ नये, त्या दृष्टीने प्रत्येक जण मास्क घालूनच घराबाहेर पडत आहे. यामध्ये सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आपणास मास्क घालून काम करताना पाहण्यास मिळत आहे. यामध्ये राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वाधिक काळजी घेताना, मागील काही दिवसात पाहण्यास मिळाले आहे. ते प्रत्येक बैठकीला, निवेदन देण्यास येणारे नागरिक, कार्यकर्ते यांच्यात सोशल डिस्टन्स ठेवून काम करीत आहे. प्रत्येकाशी दुरूनच संवाद साधत आहेत. यातून अजित पवार हे तब्येतची किती काळजी घेतात, हे दिसून आले आहे. असाच एक अनुभव आज पुण्यातील विधान भवन परिसरात जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी फिरती माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा वाहनांचे उदघाटन झाले, त्यावेळी आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आयुष प्रसाद याच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

हे वाहन शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन परीक्षण करणार आहे. त्यामुळे हे कशा प्रकारे काम असणार आहे, हे अजित पवार यांनी अधिकार्‍यांना विचारले. एका कर्मचाऱ्यास इस्त्रायलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते, असे सांगण्यात आले. त्यावर अजित पवार म्हणाले की, कुठे आहे तो कर्मचारी असे म्हणताच, तो कर्मचारी समोर आला आणि माहिती सांगू लागला. पण माहिती देताना मास्क खाली घेऊन बोलत असल्याचे दिसताच ए मास्क वर घे आणि बोल असा दम देताच, त्याने मास्क वर घेऊन माहिती देण्यास सुरुवात केली. अजित पवारांच्या या आवाजाने आजूबाजूच्या अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.