राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त झालं. याबाबत बोलताना, “विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझ्यासमोर सक्षम उमेदवार उभा केला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे मी दबकत-दबकत सांगत होतो. पण, मतदारांनी मला मोठा आशीर्वाद दिला”, असं अजित पवार म्हणाले.

दरवर्षीप्रमाणे बारामतीतील गोविंदबाग येथे अजित पवार व कुटुंबीय कार्यकर्त्यांची भेट व शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आले होते.  दरवर्षी पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने दिवाळीत बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने शारदोत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज (दि.२८) पहिल्यांदाच अजित पवार यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. प्रचारावेळी किती मतांनी जिंकून येणार असा प्रश्न पत्रकारांकडून पवारांना वारंवार विचारला जायचा. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी, “विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझ्यासमोर सक्षम उमेदवार उभा केला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे मी दबकत-दबकत सांगत होतो. पण, मतदारांनी मला मोठा आशीर्वाद दिल” असं म्हटलं.  “पक्ष सोडून गेलेले अनेकजण पडले, जे पडले त्यांनी आत्मपरिक्षण करावं. पण, जनतेनं दाखवून दिलं की लोकसभा आणि विधानसभेचा निकाल वेगळे असतात. जनतेनं मला अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य दिलं आहे. पुढील काळात विरोधी पक्षाची भूमिका अधिक चांगल्याप्रकारे निभावू” असंही अजित पवार म्हणाले.

निवडणुकीआधी प्रचारादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी अजित पवारांचा पराभव करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंत अजित पवारांनीही हे आव्हान स्वीकारत चंद्रकांत पाटलांसह सर्वांचेच बारामतीतून लढण्यासाठी स्वागत केले होते. तसेच बारामतीतून 1 लाख मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. तो या निकालातून खरा ठरला. बारामती विधानसभा निवडणुकीत भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यात लढत झाली. या लढतीत अजित पवारांनी दीड लाखांपेक्षाही अधिक मताधिक्य घेत पडळकरांचा पराभव केला. अजित पवार यांना एकूण 1 लाख 95 हजार 641 मते मिळाली. तर पडळकर यांना केवळ 30 हजार 376 मते मिळाली आणि एकूण 1,65,265 मताधिक्याने अजित पवार विजयी झाले.