उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ तर  भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सोमवारी (१४ एप्रिल) जिंतूर येथे जाहीर सभा होणार आहेत. या सभेत पवार हे बोर्डीकरांना कुठल्या भाषेत ‘लक्ष्य’ करतात व आमदार बोर्डीकर हे मुंडेंच्या व्यासपीठावर जाणार का, याकडे जिल्हय़ाचे लक्ष राहणार आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या विरोधात बोर्डीकर यांनी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे.  सोमवारी महायुतीच्या प्रचारार्थ खा. मुंडे यांची परभणी रस्त्यावरील साई मदानावर सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे.
आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुपारी १ वाजता दादा शरीफ चौक या ठिकाणी सभा होणार आहे. बोर्डीकर यांनी उघडपणे भांबळे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोर्डीकरांवर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा भाग हा काँग्रेस पक्षाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार हे बोर्डीकरांविषयी या जाहीर सभेत काय भूमिका घेणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.