अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते. महाविकास आघाडीने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फसवी आहे अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचविरोधात भाजपाने कोल्हापुरात मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केलं. ” माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे? आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा. या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे त्यामुळे त्यांचे तेच पडतील” असाही टोला पाटील यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवारच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात. अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात भाजपने आज कोल्हापुरात मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात पाच हजार लोक सहभागी झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्सच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून या मोर्चाची सुरवात झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले  यावेळी घाटगे म्हणाले, महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी पासून ९० टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. अनेक जाचक अटीमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना कसरत करावी लागणार आहे.
सरसकट कर्जमाफी, निकषात बदल करण्यासह अन्य मागण्या असलेलं निवेदन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे सहभागी झाले होते.