News Flash

Video : “… त्यामुळे अजित पवार हेच एक दिवस आघाडीचं सरकार पाडतील”

"कोण आहे तो मायचा लाल, मला दिसतेय ही अजितदादांची चाल"; अजित पवारांच्या 'त्या' विधानाला रामदास आठवलेंचं उत्तर; सत्तांतराच्या शक्यताबद्दल केलं भाष्य....

"कोण आहे तो मायचा लाल, मला दिसतेय ही अजितदादांची चाल"; अजित पवारांच्या 'त्या' विधानाला रामदास आठवलेंचं उत्तर; सत्तांतराच्या शक्यताबद्दल केलं भाष्य....(Express Photo: Nirmal Harindran)

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झालेली व्यक्तिगत चर्चा… तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट. यामुळे राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं. या भेटीगाठी होण्यापूर्वी अजित पवार यांनी सरकार पाडणाऱ्यांना आव्हान देणारं केलेलं विधान… या सगळ्याचं मुद्द्यावर आयपीआय (अ)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील सत्तांतरांबद्दलच्या शक्यताही व्यक्त केल्या.

महाविकास सरकारी आघाडी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले,”मला असं वाटतंय की, या सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बननण्याची संधी मिळाली. चांगली गोष्ट आहे. एकत्र न येणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे या तिघांमध्ये अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार कधी पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘महाविकास आघाडी सरकार गो’ हीच माझी घोषणा आहे,” असं रामदास आठवले म्हणाले.

पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊ शकतो

“अजित पवारांविषयी मला आदर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणातही आहेत. आता ते म्हणत आहेत की, ‘कोणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही.’ त्यावर मी असंच म्हणेन की, कोण आहे तो मायचा लाल, मला तर दिसतेय ही अजितदादांची चाल. त्यामुळे एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील. अजित पवार शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं होतं की, अनेक आमदार त्यांच्यासोबत आले आहेत. अजित पवारांनीही फडणवीसांसोबत जाताना आमदार बरोबर आहेत की नाही हे बघायला हवं होतं. ते न करताच ते शपथविधीला गेले. पण पु्न्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊ शकतो. असा विश्वास मला आहे. पुढे काय होतं ते बघू,” असं मतं रामदास आठवले यांनी मांडलं.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोन नेते एकत्र आले, तर…

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे पुन्हा शपथ घेतील असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “हे तीन पक्ष एकत्र येतील, असं मला वाटलं नव्हतं, पण ते एकत्र आले. त्यामुळे हे दोघे (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) एकत्र येणार नाहीत, असं जरी अनेकांना वाटत असलं, तरी सुद्धा हे दोघे कधीतरी एकत्र येऊ शकतात. शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. त्यांच्यासोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. ते आजारी असताना मी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी भविष्याच्या दृष्टीने ‘एनडीए’मध्ये यावं, अशी भूमिकाही मी मांडलेली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोन नेते एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होईल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल,” असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 7:00 pm

Web Title: ajit pawar maha vikas aghadi thackeray govt will collapse ramdas athawale interview bmh 90
Next Stories
1 भयंकर! केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा मुलगा २०० फूट खोल दरीत कोसळला
2 शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे केले भातरोपण
3 ..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले
Just Now!
X