अजित पवार यांची स्पष्टोक्ती

नगर : सत्तेतील भाजप-शिवसेना युतीने एकमेकांची भरपूर लक्तरे काढली आहेत, त्यामुळे काँग्रेसबरोबर पुन्हा आघाडी करताना यापूर्वीच्या काळातील चुकांची पुनरावृत्ती टाळू व परस्परांबद्दलची विश्वासार्हता आम्हाला निर्माण करावी लागेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एमआयएम पक्षाचा उल्लेख पवार यांनी अप्रत्यक्षपणे जातीयवादी असल्याचा करत त्यांच्याबरोबर युती होणार नसल्याचेही स्पष्ट केले.

औरंगाबादहून पुण्याकडे रवाना होताना अजित पवार काही काळ नगरमध्ये थांबले होते. महापालिकेची आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली.

या वेळी आमदार संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. राहुल जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते आदी उपस्थित होते. पवार यांनी सरकारी विश्रामगृहावर पारनेर बाजार समितीमधील वादाबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आदींच्या उपस्थितीत संचालकांची बैठकही घेतली.

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे समविचारी पक्षांना एकत्र करत असल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला.

त्यावर प्रकाश आंबेडकर, एमआयएम, मायावती हे मात्र त्यापासून दूर आहेत, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत चर्चेतून मार्ग निघू शकेल, मात्र त्यांचा हट्टच असेल तर आमचा नाइलाज आहे. परंतु शरद पवार यांनीच १९९८ मध्ये आंबेडकर, आठवले, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे यांना खुल्या जागेवरून निवडून आणले होते. एमआयएमच्या प्रश्नावर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षांशी आघाडी होणार नाही, असे सांगितले.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सत्तेतील दोन्ही काँग्रेसमध्ये बरेच वाद झाले होते, आता पुन्हा एकत्र येत आहात, यावर पवार म्हणाले की, आम्ही १५ वर्षे एकत्र होतो, त्या काळात विलासराव, सुशीलकुमार, अशोक चव्हाण यांच्या काळात व्यवस्थित कारभार झाला, अखेरच्या टप्प्यात काही प्रमाणात वाद झाले, आता पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती टाळू.

भाजपने देशाची व राज्याची अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरल्याची टीका केली.

मनपाचा निर्णय स्थानिक पातळीवर

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस समवेत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांकडे सोपवले आहेत, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, दादा कळमकर याबाबतचा निर्णय पक्ष निरीक्षकांशी चर्चा करुन घेतील, मुंबईत बसून आम्ही सर्व निर्णय घेऊ शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.

‘नगर दक्षिण’विषयी चर्चा नको

नगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसला देण्याची सूचना राष्ट्रवादीचे पदाधिकारीच करू लागले आहेत, याकडे लक्ष वेधले असता, अजित पवार म्हणाले की, जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार मलासुद्धा नाही, त्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेत असते, त्यामुळे याबाबत वक्तव्य करण्याचा अधिकार माझ्यासह कोणालाही नाही.