मोहिते-पाटील विरुद्ध पवार या संघर्षांत मोहिते-पाटील गटाला नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नात जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था मरणासन्न झाली आहे. अलीकडे दीड एक वर्षांपासून स्वत: अजित पवार यांनी सोलापूरचे प्रभारी म्हणून काम हाती घेतल्यानंतर तर पक्षाचा चेहराच हरवल्यासारखी स्थिती दिसून येते. या पाश्र्वभूमीवर सध्या राष्ट्रवादीत मरगळ झटकून नवचैतन्य आणण्यासाठी अजित पवार हे राज्यभर दौरे करीत असले तरी त्यांचे पाय सोलापूरकडे वळेनासे झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोलापूर यांचे समीकरण म्हणजे वाद, कमालीची गटबाजी असे जवळपास ठरलेले आहे. गेल्या सात-आठ वर्षांत एकसंधी राष्ट्रवादीचा चेहरा कधीही दिसून आला नाही. या पाश्र्वभूमीवर अलीकडे ही पक्षाची घडी नीटनेटकी बसविण्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्वत: सोलापूरचे प्रभारीपदाची जबाबदारी घेतली. परंतु पक्ष सावरण्याऐवजी आणखी रसातळाला गेला. गेल्या फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत तर पक्षाने हाराकिरी पत्करली. जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची अवस्था दोर कापलेल्या व भरकटलेल्या पतंगासारखी झाली आहे. प्राप्त परिस्थितीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून अजित पवार हे सोलापुरात आले नाहीत. सध्या त्यांचे राज्यभर दौरे सुरू असताना सोलापूरकडे त्यांचे पाय कसे वळत नाहीत, याबद्दल राष्ट्रवादीतच प्रश्नार्थक चर्चा सुरू आहे.

एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पालकमंत्रीपद भूषवून पकड मजबूत केलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तर स्वत: पवार हे या जिल्ह्य़ातील माढा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे पक्षाचा हा बालेकिल्ला आणखी मजबूत होईल, असा होरा होता. परंतु प्रत्यक्षात पक्षातील गटबाजीला खऱ्या अर्थाने तेव्हापासून नव्याने खतपाणी मिळत गेले. पवारांनी जिल्ह्य़ात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर साहजिकच मोहिते-पाटील गटाचे महत्त्व हळूहळू संपुष्टात येत गेले. जिल्हा बँंकेचा अध्यक्ष वा जिल्हा परिषदेचा सभापती ठरविण्याच्या राजकारणात पवार व त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या मंडळींना महत्त्व आले. मात्र यात पक्षातील बेदिली वाढत जाऊन त्यातील एकसंधपणा नाहीसा होत गेला.

या बेदिलीच्या राजकारणात पक्षात तरुण तुर्क मंडळी मोहिते-पाटील यांच्या विरोधात आक्रमक होताना त्यामागे अजितनिष्ठा महत्त्वाची मानली गेली. या पाश्र्वभूमीवर पक्षाची होणारी हानी होतच गेली. त्यातच स्वत: अजित पवार हे पक्षाची घडी बसविण्याच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्य़ात प्रभारी या नात्याने जातीने लक्ष घालू लागले. त्यासाठी त्यांनी जिल्हाभर दौरे आखले. बार्शी, पंढरपूर, कुर्डूवाडी, करमाळा, अक्कलकोट यांसारख्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी पक्षाची कमान सांभाळली खरी, परंतु पक्षाला सर्वत्रच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. किंबहुना पक्षापेक्षा अजित पवारांची ही नामुष्की होती. त्यानंतर ते पुन्हा एकदोनदा सोलापुरात आले. परंतु पक्षाची स्थिती अधिकच वाईट होत गेली. या पाश्र्वभूमीवर गेल्या फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तर कमालच झाली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून येऊनदेखील या पक्षाने अक्षरश: हाराकिरी पत्करली. मोहिते-पाटील विरोधक तथा पूर्वाश्रमीच्या अजितनिष्ठ तरुण तुर्काच्या ताब्यात जिल्हा परिषदेची सत्ता गेली. राष्ट्रवादीचे सवराधिक सदस्य निवडून आले तरी त्यातून मोहिते-पाटील यांच्या गटाला सत्तेत वाटा मिळू नये, हाच यामागे डाव होता, असे आजही राजकीय जाणकार बोलतात.

एकीकडे जिल्हा परिषदेत हाराकिरी पत्करल्यानंतर दुसरीकडे सोलापूर महापालिकेत पक्षाची अवस्था अधिकच केविलवाणी झाली. पक्षाच्या या अधोगतीनंतर त्याची जबाबदारी कोणाची याचे उत्तर अद्यापि सापडले नसतानाच अजित पवार हे पक्षाचे प्रभारी म्हणून सोलापूरकडे फिरकेनासे झाले आहेत. इकडे राष्ट्रवादी पक्षही वाऱ्यावर सोडला गेला आहे. पक्षांतर्गत दुफळीत मोहिते-पाटील गटाची ताकद कमालीची घटली असतानाच राष्ट्रवादीची शक्तीही एखाद्या क्षयरोग झालेल्या रुग्णासारखी केविलवाणी झाली आहे.

दौऱ्याची प्रतीक्षा 

अजित पवारांचे विश्वासू असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी अजित पवार हे सोलापूरचे प्रभारी असल्याने ते राज्यातील सर्व जिल्ह्य़ांचे दौरे संपवून सर्वात शेवटी सोलापूरला येणार आहेत. पक्षाची ताकद घटली असली तरी ती पूर्वपदावर आणण्यासाठी अजित पवारांचे नेतृत्वच उपयोगी पडणार आहे. त्यांच्या दौऱ्याची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

काही नेत्यांचा मोहिते-पाटील विरोध

जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची अवस्था दोर कापलेल्या व भरकटलेल्या पतंगासारखी झाली आहे. प्राप्त परिस्थितीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून अजित पवार हे सोलापुरात आले नाहीत. सध्या त्यांचे राज्यभर दौरे सुरू असताना सोलापूरकडे त्यांचे पाय कसे वळत नाहीत, याबद्दल राष्ट्रवादीतच प्रश्नार्थक चर्चा सुरू आहे.या बेदिलीच्या राजकारणात पक्षात तरुण तुर्क मंडळी मोहिते-पाटील यांच्या विरोधात आक्रमक होताना त्यामागे अजितनिष्ठा महत्त्वाची मानली गेली.