राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्‍व अभियानअंतर्गत विस्तारीत समाधान योजना, सृजन शासकीय योजना शिबिराला उपस्थित होते. यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत भाषण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळेस त्यांनी निवडणुकीला उभं रहावे की नाही असा विचार करत बसलेल्या कार्यकर्त्यांना सुनावले. “श्रीगोंदा मतदारसंघामधून राष्ट्रवादीने शेवटच्या टप्प्यात घन:श्याम शेलार यांना उमेदवारी जाहीर केली. एक महिना आगोदरच त्यांनी कामाला सुरुवात केली असती तर आज तेही आमदार झाले असते,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“राज्यातील अनेक तरुण नेते विधानसभेच्या निवडणुकीला उभं रहाण्यासंदर्भात संभ्रमात होते. राहुरीचे मंत्री प्राजक्त तनपुरे हेही त्यापैकीच एक. राहुल जगताप यांनाहीही श्रीगोंद्याची हातची जागा ‘व्हय नाय.. व्हय नाय’ करतच घालवली,” असा टोला पवारांनी लगावला. श्रीगोंदा येथील पराभवाचे विश्लेषण करताना पवारांनी, “श्रीगोंद्याचे तत्कालीन आमदार राहुल जगताप राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यासंदर्भात संभ्रमात होते. त्यांचे वडील अशते तर त्यांना उमेदवार करण्याची गरजच पडली नसती. त्यांचे वडील हे अशा विषयांमध्ये खूप धाडसी होते. त्यांनी धाडसाने निर्णय घेतला असता. मात्र आजचे तरुण कार्यकर्ते धाडस दाखवण्यात कमी पडतात. असं का होतं कळत नाही. मंत्री प्राजक्त तनपुरेही विधानसभा निवडणुक लढवण्याबद्दल गोंधळात होते. ‘दादा उभं राहू का? नाही थांबतोच’, असं सारखं म्हणत होते. पक्षाने दिलेली उमेदवारी घेण्यासंदर्भात अनेकजण संभ्रमात होते. सगळ्यांची नावं मी घेणार नाही पण तरुणांनी धाडसाने उभं राहण्याची गरज आहे,” असं मत व्यक्त केलं.

यावेळेस बोलताना त्यांनी आपला पुतण्या आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे उदाहरण राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांना दिले. “रोहित पवार यांच्याकडं बघा. ते पुण्यातून कर्जतला आले आणि कर्जत जामखेड्या मतदारांनी त्यांना जिंकून दिले. रोहितसारखे धाडस सगळ्यांनीच केलं पाहिजे,” असं पवार यांनी आवर्जून सांगितलं.