2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अजूनही राजकीय तणाव सुरु आहे. काल(दि.7) अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष पहायला मिळाला. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात चार आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेतील घटना निंदनीय आहे असं अजित पवार म्हणालेत. “जगात अशाप्रकारचे हल्ले होणं निंदनीय बाब आहे. या घटनेचा धिक्कार केला पाहिजे. वेगवेगळी मतं विचार असू शकतात, सगळ्यांना एकाचेच विचार पटतील असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. परंतु तिथे निवडणूक सुरू होती आणि निकाल लागला तेव्हापासूनच ऐकायला मिळत होतं की ट्रम्प यांना निकालच मान्य नाही. मतमोजणीला मानत नाही असं ते म्हणाले होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण आपण त्याबाबत फार चर्चा करण्यापेक्षा आपल्या समस्यांना आणि प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप, ग्रामरक्षक दलाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

आणखी वाचा- ‘…लाज वाटायला पाहिजे’, US Capitol मधील हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार संतापल्या

काय झालं अमेरिकेत ?
निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची काल बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसले आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात चार आंदोलनकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. पण त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.

आणखी वाचा- अमेरिका नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचं राष्ट्र असायला हवं – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकन काँग्रेसकडून बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार –

दरम्यान, अमेरिकी काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे.