News Flash

कुणीही आघाडीत मिठाचा खडा टाकू नये; राऊतांच्या ‘रोखठोक’वरून अजित पवारांनी साधला निशाणा

"अनावश्यक बोलण्याऐवजी निर्णयांचा आदर करायला हवा"

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे, परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावर शिवसेनेचे नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक स्तंभातून भाष्य केलं होतं. राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही सवाल केले होते. राऊत यांच्या या लेखावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

“देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते,” असं म्हणत राऊत यांनी अनिल देशमुखांना खडेबोल सुनावले होते.

आणखी वाचा- “आता तरी रहस्य कथेचा शेवट करा; काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे”

राऊतांच्या या लेखावर अजित पवारांनी यांनी भाष्य केलं आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना पवारांनी राऊतांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “तीन पक्षाचं महाविकास आघाडी सरकार नीटपणे काम करत असताना कुणीही त्यात मिठाचा खडा टाकू नये. मंत्रीपदाचं वाटप तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रीपदाचं वाटपासह पक्षातील सगळे निर्णय घेतात. तिच पद्धत महाविकास आघाडीतील इतर पक्षामध्येही आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील नेत्यांनी अनावश्यक विधानं टाळून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा सन्मान ठेवायला हवा,” असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- पवार-शाह भेटीची चर्चा; भाजपा आमदाराने फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला लगावला होता.”देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्यानं कमीत कमी बोलावं. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणं बरं नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असं वर्तन गृहमंत्र्यांचं असायला हवं. पोलीस खात्याचं नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसतं. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असतं. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसं चालेल?”, असं राऊत म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 9:02 am

Web Title: ajit pawar reaction on sanjay rauts accidental home minister remark bmh 90
Next Stories
1 करोना संकटात अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
2 दीपाली चव्हाण प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे
3 खोंब्रामेंढा-हेटाळकसाच्या जंगलात नक्षल-पोलीस चकमक
Just Now!
X