माजी आमदार अशोक काळे यांचा गोदावरी खोऱ्यातील तालुक्याच्या हक्काच्या ११ टीएमसी पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तो यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नाला अग्रक्रम देऊ, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे दिले. यापुढे सर्वानी एकत्रित येऊन बेरजेचे राजकारण करू असेही ते म्हणाले.
माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच ४२ कोटी ५३ लाख रुपये खर्चाच्या १३२ केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना कर्मवीर शंकरराव काळे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी सिंधुताई विखे यांनी तो स्वीकारला. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. माजी आमदार माणिक कोकाटे, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, चंद्रशेखर कदम, डॉ. सुजय विखे, सिद्धार्थ मुरकुटे, संदीप वर्पे, लहानूभाऊ नागरे आदी या वेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांच्याशी माझा जवळून संबंध आला. शेतकरी जगला पाहिजे, हीच भूमिका घेऊन त्यांनी सहकारात मोठे काम उभे केले. तोच पायंडा अशोक काळे व आशुतोष हे पुढे चालवत आहेत.  
अशोक काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व तेथील व्यवस्थापनावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी खासदारकीच्या निवडणुकीपासून शिवसेनेला कंटाळलो होतो. त्यांचे माझे अजिबात जमत नव्हते. मी जरी शिवसेनेत होतो तरी माझी सर्व कामे अजित पवार यांनीच मार्गी लावली. माझ्यामुळे शिवसेनेला आमदारकी मिळाली, शिवसेनेमुळे मला नाही. पुढच्या वेळी मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, असेही त्यांनी जाहीर केले.
डॉ. अनिल पाटील यांचेही या वेळी भाषण झाले. आशुतोष काळे यांनी स्वागत केले.