राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बेधडक बोलण्याची शैली राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अजित पवारांच्या याच बोलण्याच्या स्टाईलचे अनेक चाहतेही आहेत. पण, याच शैलीमुळे अजित पवारांच्या राजकीय जीवनात वादही निर्माण झाले. त्यानंतर अजित पवार तोलूनमोपून बोलताना दिसतात. अमरावतीत प्रकारांशी बोलताना त्यांनी याला पुष्टीच दिली. अजित पवार म्हणाले, “अनेकवेळा ‘ध’ चा ‘मा’ केला जातो, असे इतिहासच सांगतो. मी तर आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो. सर्व गोष्टी तोलून मापून बोलाव्या लागतात. ज्यातून गैरसमज निर्माण होईल, शंका-कुशंकेला वाव मिळेल, अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आपण सहकाऱ्यांकडून देखील व्यक्त करतो,” असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार मंगळवारी अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारमधून बाहेर पडण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले, “बहुतांश वेळा ‘ध’ चा ‘मा’ केला जातो. इतिहासच असं सांगतो. आता तर मी काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो. सर्व गोष्टी तोलून मापून बोलाव्या लागतात. ज्यातून गैरसमज निर्माण होईल. शंका-कुशंकेला वाव मिळेल, अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आपण सहकाऱ्यांकडून देखील व्यक्त करतो,” असं ते म्हणाले.

अमरावती विभागातील सिंचन अनुशेषाविषयी अजित पवार म्हणाले, मध्यंतरीच्या काळात सिंचन खात्यातील अधिकाऱ्यांच्या चौकशीदरम्यान अनेकांना त्यात गुंतून पडावे लागले. माझ्यासहित अनेकांची चौकशी झाली. चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली. यात अनेक प्रकल्प रखडले, पण आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून सिंचन प्रकल्पांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातून बुलढाणा जिल्ह्यातील जिगावसह अमरावती जिल्ह्यातील सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लागू शकतील.”

बाकीच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही-

राज्याच्या विकासासाठी आम्ही किमान समान कार्यक्रमानुसार काम करण्याचे ठरवलेलं आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही. बाकीच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

“संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसं त्यांनी लिहून दिलं असल्यानेच सरकार स्थापन झालं,” असं अशोक चव्हाण एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.