बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील महत्वाचे नेते आहेत. त्यांचे स्मारक ५वर्षे का रेंगाळले ? हा माझा प्रश्न चुकीचा नव्हता. स्पष्ट बोलल्यानेच त्यांना कोल्हापुरी मिरची झोंबली, असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आज अजित पवार यांची खरडपट्टी काढण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या रेंगाळलेल्या स्मारकावरून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेकडून करण्यात आलेली टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.

ग्रामीण भागात बाप असा शब्दप्रयोग केला जातो, तर शहरी भागात वडील असा उल्लेख केला जातो. माझा शब्दप्रयोग योग्यच आहे. चांगल्या भावनेनेच मी माझी भूमिका मांडली होती. पण सत्य बोचल्याने त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली असली तरी त्याकडे लक्ष देत नाही . कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत,असे अजित पवार म्हणाले.

सत्तेत राहायचे आणि विरोधक म्हणून कामगिरी करायची या शिवसेनेच्या दुटप्पी प्रवृत्तीवर पूर्वी आपण ‘गांडूळ’अशी उपमा दिली होती याची आठवण करुन देऊन पवार यांनी पुन्हा शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले.

काकांच्या पुण्याईने ते तरले आहेत,या शिवसेनेच्या टिकेकर अजित पवार म्हणाले कि, शरद पवार हे आमचे दैवत आहे.त्यांनी पक्ष सुरू केला असल्याचे ऋण सर्वच मान्य करतो. शेवटी कोणीतरी पक्ष सुरू केल्याशिवाय त्याचे काम चालत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला म्हणून आज तो दिसतो, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे हेही पित्याच्या कर्तृत्वावर राजकारण करत असल्याचे अधोरेखित केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar slam shivsena
First published on: 27-10-2018 at 14:41 IST