विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केलं. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास काय फायदा होतो हे या निवडणुकीमधून दिसून आल्याचं म्हटलं. तसेच अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आम्ही एकटं यायचं की आघाडी करून यायचं हे आमचे वरिष्ठ ठरवतील असं उत्तरही दिलं.

नक्की वाचा >> वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे…; अजित पवारांचा भाजपाला टोला

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी एक-एकटं लढावं असं वक्तव्य केल्याचं सांगत पत्रकारांनी यावर अजित पवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना आम्ही कसंही येऊन कोणी बिनकामाचा सल्ला देण्याची गरज नाही अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं. “हे बघा आम्ही एकटं यायाचं की आघाडी करुन यायचं ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. यांनी कोणी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही,” असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. पुढे बोलताना खास गावरान भाषेत त्यांनी, “हे बघा एक नक्की आहे. म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांच त्यांना लखलाभ”

तीन पक्ष एकत्र आल्यास…

एकत्रित येण्याचं बळ या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं आहे असं म्हणतात अजित पवारांनी सर्व ठिकाणी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी एकत्र येऊन काम केल्याचं सांगितलं. आगामी काळात जास्तीत जास्त एकत्र येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या वेगळं लढण्यानं विरोधकांच फावणार असेल तर तसं व्हायला नको. आम्ही पराभव स्वीकारतो आणि चिंतन करतो, अशी भूमिका चंद्रकांत दादांनी करणे अपेक्षित होते. मात्र ते दावे करीत आहे, असंही अजित पवार म्हणाले.