सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत सभापती बिनविरोध

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडणुका भाजप पुरस्कृत महाआघाडीने बिनविरोध निवडून आणल्या. राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत होत असताना देखील पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणातून राष्ट्रवादीने हाराकिरी केल्याचा पुरेपूर लाभ भाजपा पुरस्कृत महाआघाडीने उठविला. आश्चर्याची बाब म्हणजे शेतकरी कर्जमाफी संघर्ष यात्रा घेऊन आलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सोलापुरात मुक्काम असताना राष्ट्रवादी आघाडीने भाजप पुरस्कृत महाआघाडीला जिल्हा परिषदेची सत्ता आंदण दिल्याचे दिसून आले.

सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्याच्या सभापती निवडीची प्रक्रिया उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. अक्कलकोटचे काँग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन महादेव पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपदाची संधी मिळाली. तर अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतिपदी मोहोळचे विजयराज डोंगरे यांची वर्णी लागली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदावर पंढरपूरच्या रंजना बाळासाहेब देशमुख तर समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवेढय़ाच्या शीला शिवशरण यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद सिद्रामप्पा पाटील यांना शिक्षण व आरोग्य खाते मिळाले.

समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजप पुरस्कृत शीला शिवशरण यांच्या विरोधात राष्ट्रवादी आघाडीचे अनिल मोटे (शेकाप, सांगोला) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी रंजना देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी आघाडीने शेकापच्याच स्वाती कांबळे यांची उमेदवारी आणली होती. परंतु शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी आघाडीने दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्व सभापती बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

या वेळी जिल्हा परिषद सभागृहात नूतन सभापतींची बिनविरोध निवड घोषित होताच त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी सभागृहनेतेपदी भाजपाचे आनंद तानवडे यांची तर विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे बळिराम ऊर्फ काका साठे (उत्तर सोलापूर) यांची निवड जाहीर करण्यात आली.

विषय समिती सभापतींच्या निवडीत अक्कलकोट तालुक्याला झुकते माप मिळाले. तेथील काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दोन्ही काँग्रेसची आघाडी अधिकृतपणे घोषित होऊन देखील पक्षश्रेष्ठींचा आदेश खुंटीवर टांगून भाजप पुरस्कृत महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची बक्षिसी म्हेत्रे यांना मिळाली. त्यांच्या गटाला यापूर्वी शिवानंद पाटील यांच्या रूपाने उपाध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर सोमवारी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद म्हेत्रे यांचेच समर्थक मल्लिकार्जुन पाटील यांना मिळाले. समाजकल्याण समितीच्या नूतन सभापती शीला शिवशरण या मंगळवेढय़ातील नेते समाधान अवताडे गटाच्या मानल्या जातात.

तर पंढरपूरच्या परिचारक गटाला रंजना देशमुख यांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद मिळाले.

विषय समितीच्या सभापतींच्या निवडीसाठी सकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या ‘नंदादीप’ बंगल्यात भाजपा पुरस्कृत महाआघाडीच्या नेत्यांची बैठक होत असताना दुसरीकडे शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या बैठकीत माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपस्थिती दर्शवून आपली ताकद भाजप पुरस्कृत सत्तेमागे आपली ताकद उघडपणे उभी केली. तर राष्ट्रवादीच्या बैठकीकडे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे फिरकले नाहीत. बार्शीचे आमदार दिलीप सोपल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील-अनगरकर, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे ही मोजकी मंडळी हजर होती.

आश्चर्य म्हणजे या सभापती निवडी होण्याअगोदर काल रविवारी रात्री शेतकरी कर्जमाफी संघर्ष यात्रा घेऊन आलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला होते. सकाळी त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी जिल्हा परिषदेतील सत्ताकारणासह इतर राजकीय घडामोडी जाणून घेतल्या. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली हाराकिरीचे धोरण कायम ठेवल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.