राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याअगोदर रामदास आठवले व ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा काटा काढला. आता ते मलाही संपवायला निघाले आहेत, परंतु यातून राज्यातील परिवर्तनवादी चळवळ कधीही संपणार नाही, तर उलट आम्ही दलित नेते एकत्र येऊन राष्ट्रवादीलाच त्याची किंमत मोजायला लावू, असा इशारा राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिला आहे.
आपण पवार घराण्यावर गेली ३८ वर्षे निष्ठा ठेवत शरद पवार यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु आता अजित पवार हे आपल्या प्रवृत्तीप्रमाणे वागत आहेत, अशा शेलक्या शब्दांत प्रा. ढोबळे यांनी टीकास्त्र सोडले. या संदर्भात आपण लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या विरोधात दाद मागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोहोळ तालुक्यातील वाघोलीची महात्मा फुले मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणी प्रा. ढोबळे यांनी २५ वर्षांपूर्वी उभारली होती. ही सूतगिरणी सुरुवातीपासून आजतागायत त्यांच्याच ताब्यात आहे, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ राखीव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा पत्ता कापून त्यांचेच एकेकाळचे सहकारी रमेश कदम यांना संधी दिली. कदम हे आमदार झाले. प्रा. ढोबळे यांना बंडखोरी करावी लागली होती. तेव्हापासून प्रा. ढोबळे व आमदार कदम यांच्यात कलगीतुरा सतत पाहायला मिळतो. या पाश्र्वभूमीवर म. फुले मागासवर्गीय शेतकरी सूतगिरणीची निवडणूक लागली. यात प्रा. ढोबळे गटाने बाजी मारली. सत्ता कायम ठेवल्यानंतर प्रा. ढोबळे हे अजित पवार यांच्यावर घसरले. मागासवर्गीय शेतकऱ्यांची सूतगिरणी कशीबशी चालू असताना ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी आमदार रमेश कदम यांच्या माध्यमातून केला, असा आरोप प्रा. ढोबळे यांनी केला.