राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पन्नास नावं आहेत, मात्र अजित पवारांचे नाव टीआरपीसाठी पुढे केले जाते आहे असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. आम्हाला न्यायालयाचा पू्र्ण आदर आहे, तो केलाच पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पंढरपुरात येऊन सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

सहकार म्हणजे काय हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसून त्यात त्यांचा अभ्यास नाही त्यामुळे ते सहकाराचा स्वाहाकार झाला आहे असा आरोप करत आहेत. हा आरोप ज्यांनी सहकार सुरु केला त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्यावर होतोय हे दुर्दैव आहे  असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.  अनेक देश आपल्या देशातील सहकारातून शिकत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून त्यांनी ते किती असंवेदनशील आहेत हे दाखवून दिले आहे असेही सुप्रिया सुळे म्हटल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. चंद्रकांत पाटील यांना फक्त आरोप करता येतात. आरोप करण्यात ते तरबेज आहेत.  मात्र त्यांनी एखाद्या मुद्द्यावर शास्त्रीयदृष्ट्या पटेल असं उत्तर देऊन दाखवावं असं म्हणत आघाडी सरकारमुळे पूर आला या त्यांच्या वक्तव्याचाही सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.

धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या आवारात आत्महत्या केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रे दरम्यान धर्मा पाटील यांच्या पत्नीला आणि कुटुंबीयांना जी वागणूक दिली जाते आहे ती दुर्दैवी आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर आणीबाणीबाबत बोलणारा भाजपा हा पक्ष आता छुपी आणीबाणी राबवतो आहे असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला.

मंदीचा विषय राजकीय नाही  या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. हजारो तरुणांना त्यांची  नोकरी गमवावी लागते आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत काळात आले आहे त्यामुळे हा निवडणुकीचा विषय नसून सामाजिक विषय आहे असंही सुप्रिया सुळे म्हटल्या.