24 October 2020

News Flash

रंगभूमीचा इतिहास सांगणारे कलादालन उभारणार

उद्धव ठाकरे यांची घोषणा; सकारात्मक नाटय़संमेलनाचा तृप्त समारोप

अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या समारोप समारंभामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रसाद कांबळी यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, स्वागताध्यक्ष विनोद तावडे उपस्थित होते. नाटय़संमेलनाला नाटय़प्रेमींनी शुक्रवारीही मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.

उद्धव ठाकरे यांची घोषणा; सकारात्मक नाटय़संमेलनाचा तृप्त समारोप

आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून आनंदाचे क्षण निर्माण करणाऱ्या मराठी रंगभूमीचा पावणेदोनशे वर्षांचा इतिहास चितारणारे कलादालन मुंबईत महापालिकेतर्फे उभारू , अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केली.

गेले तीन दिवस रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगलेल्या या नाटय़संमेलनाचा औपचारिक समारोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. ६० तास अखंड चालणाऱ्या या संमेलनातील उर्वरित कार्यक्रम त्यानंतरही सुरूच राहिले.  संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात बाहेरगावच्या रंगकर्मीना मुंबईत आश्रयस्थान मिळावे अशी जी मागणी केली होती त्याचा संदर्भ घेऊन ठाकरे यांनी अंधेरीतील शहाजीराजे क्रीडासंकुलात ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे ठोस आश्वासनही यावेळी दिले.

गेले तीन दिवस अखंडपणे सुरू असलेल्या या नाटय़संमेलनात रसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन जे जागरण केले ते त्यांच्या रसिकत्वाचे लक्षण आहे, असे सांगून ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूरला झालेल्या ८८व्या नाटय़संमेलनातून उरलेल्या चार कोटी रुपयांच्या रकमेतून आम्ही त्यावेळी निर्मलकुमार फडकुले नाटय़गृह बांधले आणि ते प्रायोगिक आणि हौशी रंगकर्मीना उपलब्ध करून दिले. अशाप्रकारचे काहीतरी ठोस काम या नाटय़संमेलनाच्या माध्यमातून उभे राहावे अशी इच्छाही त्यांनी प्रकट केली. टीव्हीमुळे मराठी नाटकाचा प्रेक्षक हरवला अशी जी ओरड केली जाते त्यात काहीच तथ्य नाही, हे या संमेलनास उपस्थित असलेल्या रसिकांच्या तुडुंब गर्दीने सिद्ध केले आहे. टीव्हीचा प्रेक्षक टीव्हीकडे जातो, नाटकाचा प्रेक्षक नाटकाकडेच येतो, तेव्हा काळजी करण्याचे काहीच कारण नाही असेही ते म्हणाले.

संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी रसिकांनी या संमेलनाला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आज माणसामाणसातील हरवलेल्या संवादाकडे निर्देश करत रंगकर्मीमध्येही संवाद हरवल्याची खंत व्यक्त केली. पूर्वीसारखे नाटकवाल्यांचे अड्डे पुन्हा निर्माण व्हावेत, ज्यातून अनेक नवनव्या नाटकांच्या कल्पना पुढे येऊ शकतील असे त्या म्हणाल्या.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी अल्पावधीत भरवले गेलेले हे संमेलन नाटय़ परिषदेचे पदाधिकारी आणि रसिकांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल आनंद व्यक्त करून १००वे नाटय़संमेलन दोन वर्षांनी होणार आहे. त्याची आत्ताच आखणी सुरू करण्याचे आवाहन समस्त रंगकर्मीना आणि नाटय़ परिषदेला केले. संमेलनाच्या ‘टी फॉर थिएटर’ आणि ‘टी फॉर ट्रंक’ या बोधवाक्याच्या धर्तीवर टी फॉर थक्क करणारे संमेलन असा या संमेलनाचा साभिमान उल्लेख करता येईल. समांतर रंगभूमीसाठी स्वतंत्र प्रेक्षागृह उपलब्ध करून देण्यासाठी लागेल तो निधी देण्याचे ठोस आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. बालरंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या विद्याताई पटवर्धन यांची काळजी आता महाराष्ट्र शासन घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बॅकस्टेज कलाकारांसाठी नाटय़ परिषदेच्या सहकार्याने मेडिक्लेमची योजना शासन राबवेल अशीही घोषणा त्यांनी केली.

याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी रसिकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा ‘नाटय़ नातलग’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला. संमेलनातील परिसंवादात व्यक्त झालेल्या अनेक मुद्दय़ांवर नाटय़ परिषदेने आधीच कार्यवाही सुरू केली आहे, असे ते म्हणाले.

प्रारंभी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक यांनी प्रास्ताविकात नाटय़संमेलनाच्या उपलब्धीबद्दल रसिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संमेलनाच्या संकल्पनेतील आगळे वेगळेपणाबद्दलची माहिती दिली. प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचेही यावेळी भाषण झाले. संमेलनात गावोगावच्या नाटय़वितरकांचा सन्मान करण्यात आला.

पुण्यातील रंगकर्मीची भोजनव्यवस्था करणारे विवेक जोशी यांना त्यांच्या आजारात उपचारांकरिता मदत म्हणून एक लाख रुपये साह्य़ करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी नाटय़ परिषदेला पाच लाखांचा निधी आपण देत असल्याची घोषणा यावेळी केली. स्वागत समिती सदस्य खा. किरीट सोमय्या, माजी खा. संजय दिना पाटील, खा. संजय राऊत, आ. सरदार तारासिंग, आ. सुनील राऊत, प्रियदर्शिनी प्रतिष्ठानचे आदेश बांदेकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचा समारोप प्रसंगी सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी खुल्या अधिवेशनात विविध ठराव मंजूर करण्यात आले.

विनोदी नाटकांवर गंभीर चर्चा..

मध्यंतरीच्या काळात विनोदी नाटकांचे एक भलतेच पेव फुटले होते. त्यासंदर्भात तशी नाटके केलेल्या देवेंद्र पेम, केदार शिंदे आणि संतोष पवार यांना तुम्ही गंभीर नाटके का केली नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वेगळ्या धाटणीची नाटके आम्ही केली. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग जे विकले जाते ते आम्ही सादर केले. आम्ही विनोदासाठी विनोद कधीही केला नाही. मात्र आम्हाला कधीही फारसे गंभीरपणे घेतले गेले नाही, अशी खंत या नाटय़कर्मीनी व्यक्त केली. कलावंतच मूळ संहितेत वाटेल तसे बदल करतात. मग रसिक गंभीरपणे कसे घेणार, असा सवाल प्रतिमा कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

परिसंवादातील वेचक वेधक

यंदाच्या नाटय़ संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात दुसऱ्या दिवशी केवळ एकच परिसंवाद ठेवण्यात आला होता. या परिसंवादामध्ये जुन्या नव्या रंगकर्मीनी एकूणच मराठी रंगभूमीविषयी आपली मते आणि सूचना स्पष्टपणे मांडल्या. त्यामुळे हा परिसंवाद म्हणजे नाटय़ रसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरली. एखाद्या लोकप्रिय नाटकाप्रमाणे हाऊसफुल्ल गर्दी या परिसंवादाला होती. या परिसंवादात खालील मुद्दे प्रकर्षांने मांडले गेले.

सेन्सॉरचा जाच..

शासनाने नेमलेली सेन्सॉरशिप असावी, मात्र त्यातील सदस्य नाटक कळणारे असावेत असा एक मुद्दा या परिसंवादात मांडण्यात आला. त्याचप्रमाणे सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही समाजातील काही घटकांकडून नाटय़संहितेत बदल करण्याबाबत दबाव टाकला जातो. नाटय़कर्मीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर या प्रवृत्तींना रोखायला हवे. नाटय़ परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीने यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

एकांकिकांकडे लक्ष द्यावे..

रंगमंचावर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी ऑल दी बेस्ट, यदाकदाचित ते आता गाजत असलेले ‘संगीत देवभाबळी’ आणि ‘अनन्या’ ही नाटके मूळच्या एकांकिका होत्या. मराठी रंगभूमीला नवी ऊर्जा आणि विचार एकांकिकांमधून मिळतात. त्यामुळे राज्यभरातील एकांकिकांच्या स्पर्धाकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्या. त्यातील गुणवत्ता हेरा. तिला व्यासपीठ उपलब्ध करून द्या; असे मत जुन्या नव्या पिढीतील रंगकर्मीनी मांडले.

तालमीसाठी सुसज्ज जागा हवी..

मराठी नाटकांच्या तालमींसाठी अजूनही चांगली व्यवस्था नाही. नाटय़गृह सुसज्ज करण्याबरोबरच तालमींसाठीही चांगली व्यवस्था हवी, अशीही मागणी रंगकर्मीनी या परिसंवादात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 2:36 am

Web Title: akhil bharatiya marathi natya parishad 2018 2
Next Stories
1 वाकडी घटनेस जातीय रंग देण्याचा प्रयत्न
2 महावितरणच्या मासिक खर्च आणि वसुलीत ३५० कोटींची तूट
3 अधिक मासात विठ्ठलचरणी २ कोटी ३२ लाखांचे दान
Just Now!
X