News Flash

मी निघालो शारदेच्या उत्सवाला, पोचलो लष्कराच्या छावणीला..!

मान्यवरांच्या कविसंमेलनालाही निषेधाची किनार

|| शफी पठाण

मान्यवरांच्या कविसंमेलनालाही निषेधाची किनार

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या प्रकाराचे पडसाद संमेलनातील सर्व सत्रांत कमी-अधिक प्रमाणात उमटत आहेत. रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रात मान्यवरांचे कविसंमेलन झाले. या संमेलनासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे खास निषेधाची कविता घेऊनच मंचावर आले. ठेव वीणा दूर आता.. या त्यांच्या कवितेतून त्यांनी लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासभोवताली उभारण्यात येणाऱ्या काटेरी भिंतीवर कठोर प्रहार केला. दवणे कवितेत म्हणाले, टोपणाने बंद केले लेखनीला, अच्छे दिन आ गये है झाकणाला.. मी निघालो उत्सवाला शारदेच्या, पोचलो पण लष्कराच्या छावणीला.. ठेव वीणा दूर आता शस्त्र घे तू.. तूच दुर्गा लेखणीच्या राखणीला..

कवी बबन सराडकर उपेक्षितांचे भोग मांडताना म्हणाले, चोचीला दाणा कुठला, हे कोणी विचारत नाही, भरवता कसे पिल्लाला, हे कोणी विचारत नाही.. अजीम नवाज राही यांनी त्यांच्या प्रसिद्ध काळा घोडा या संग्रहातील एक भावगर्भ कविता सादर केली. ते म्हणाले, विशिष्ट उंचीवर जाऊन स्थिर पंखांनी तरंगणाऱ्या घारीसारखे असतात काही अनुभव.. अशोक नायगावकरांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेची भीषण विदारकता आपल्या कवितेतून मांडली. ते कवितेत म्हणाले, जिथे तुमची पोती रचली आहेत, तिथे डी.एड. कॉलेज होते. इगतपुरीचे कवी तुकाराम म्हणाले, रानकविता म्हणजे साधी गोठ नाही, इथं जगण्यासाठी जीवाचेच रान करावे लागते. अरुण म्हात्रे आपल्या कवितेत म्हणाले, बघ रक्तात पसरत गेल्या दुष्काळाच्या वाटा..बघ जगण्याचा हमीभावही गेला फासावरती.. मुबारक शेख यांची कविताही हृदयस्पर्शी ठरली. कविसंमेलनाचे संचालन अरुण म्हात्रे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:24 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan 2019 11
Next Stories
1 झुंडशाहीचा तातडीने बंदोबस्त करा!
2 साहित्य क्षेत्रात राजकारण्यांचा हस्तक्षेप नको
3 निषेधाचे काव्य..!
Just Now!
X