|| मोहन अटाळकर

मानवतावादी दृष्टिकोन हाच आधुनिक विचार!

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके

शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काडीमात्र संबंध नाही, आधुनिकता ही पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणात नाही तर विचारांमधील आधुनिकीकरणातूनच ती मिळू शकते. मानवतावाद, विश्वात्मवाद जपणारा, प्रत्येक माणसाला आपलेसे करणारा विचार, त्यांच्या भावभावनांचा विचार हा खरा आधुनिक विचार म्हणता येईल, असे प्रतिपादन प्रख्यात समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी येथे केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. बंग यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला. कवयित्री सना पंडित आणि लेखिका डॉ. मोना चिमोटे यांनी डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला.

डॉ. बंग म्हणाल्या, ‘माझा जन्म एका सधन कुटुंबात होऊनही जीवनाविषयी माझे ध्येय निश्चित झाले होते. वैद्यकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर डॉ. अभय बंग यांच्याशी झालेला प्रेमविवाह एका वेगळ्या विधायक विचाराने झाला. डॉ. अभय बंग यांच्यासमवेत सामाजिक क्रांतीसाठी झोकून देत आम्ही काम करण्याचा निर्धार केला आणि दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्य़ात सार्वजनिक आरोग्य सेवेची मशाल पेटवण्याचा ध्यास घेतला. आदिवासींशी निर्माण झालेल्या नात्यामुळेच आम्ही अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. नक्षलवाद्यांविषयीचा अनुभवही खूप मोठा आहे. काही वेळा संघर्षांचे प्रकार घडले, पण त्यांनी कधीही आमच्या सेवाकार्यात अडथळे आणले नाहीत.’ जगणे म्हणजे काय, जगण्याचा अर्थ काय, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. केवळ संपत्ती जमवणे हा जीवनप्रपंच न मानता समाजहितासाठीही काहीतरी देण्याची भावना ठेवावी. कारण सेवाभाव ही खरी संपत्ती आहे. समाजसेवेत मिळणारा आनंद खूप मोठा आहे. तो आम्ही अनुभवत आहोत, असेही डॉ. बंग म्हणाल्या.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आपण मोर्चे काढले. कायदेही बदलले आहेत. पण, अजूनही लैंगिकतेविषयी जागृती निर्माण झालेली नाही. स्त्रीकडे भोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाते. त्याला तरुण पिढी बळी पडत आहे. व्यसनाधीनता वाढत आहे. हे थांबवले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. युवा पिढीने स्वातंत्र्याच्या सीमारेषाही ओळखल्या पाहिजेत, असेही डॉ. बंग म्हणाल्या.

शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काडीमात्र संबंध नाही, असे सांगून डॉ. बंग म्हणाल्या, की आदिवासी संस्कृतीविषयी बरेच गैरसमज आहेत. त्यांच्याकडे चोऱ्या होत नाहीत, विनयभंगाचे प्रकार घडत नाहीत. लग्नात हुंडा मागितला जात नाही.

सुसंस्कृत कोण हा प्रश्न पडावा, इतपत आदिवासी समाजामध्ये पुढारलेली व्यवस्था आहे. आता शिक्षणाचे प्रमाणही वाढत चालले आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय आला तेव्हा आम्ही मुलांना आमच्यासोबत गडचिरोलीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर काहीही लादले नाही. शिक्षणातही ते अव्वल होते. आज तेही समाजकार्यात आम्हाला मदत करीत आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्यामुळे निर्माण झालेल्या वादाबद्दल दु:ख व्यक्त केले. काही गुंड प्रवृत्तींमुळे अप्रिय निर्णय घ्यावा लागला, तरी घरचा कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, असे डॉ. राणी बंग म्हणाल्या. या कार्यक्रमातील निमंत्रित डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुलकर्णी आणि राजीव खांडेकर अनुपस्थित होते.