18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

अ. भा. मराठी ‘अ-साहित्य’ संमेलन!

चिपळूण येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा सोहळा

खास प्रतिनिधी, रत्नागिरी | Updated: January 4, 2013 5:16 AM

चिपळूण येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा सोहळा आहे की राजकीय पक्षाचे अधिवेशन, असा प्रश्न आधीपासूनच पडला होता. मात्र आता या संमेलनाची ‘सस्नेह निमंत्रण’ पत्रिका, त्यातील असाहित्यिक कार्यक्रम आणि परिसंवादांतील वक्त्यांची नामावळी पाहता या संमेलनात साहित्याची अवस्था ‘मंत्रालयाच्या दारात उभ्या असलेल्या मराठी भाषे’सारखीच असल्याचे दिसत आहे. शिवाय संमेलनातील कार्यक्रमांच्या बाबतीतही त्यांच्या दर्जापेक्षा संख्येवरच जास्त भर दिल्याचे दिसत आहे.
कोणत्याही साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचे विषय आणि वक्ते मराठी साहित्य महामंडळ व संबंधित यजमान संस्था निश्चित करतात. पण या संमेलनात यजमान संस्थेचे सर्व लक्ष उत्तम दर्जाचे साहित्य संमेलन करण्यापेक्षा संमेलनातून शिल्लक राहणाऱ्या निधीवर असल्यामुळे कार्यक्रमांच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले गेले नसावे, असे जाणवत आहे.
नामवंत ज्येष्ठ साहित्यिक निमंत्रित करावयाचे झाल्यास पूर्वनियोजन आवश्यक असते. तसेच त्यांचे मानधन, प्रवास-निवास यावर जास्त खर्च करावा लागतो. त्यामध्ये बचत करण्याचेही धोरण या संमेलनातील सहभागी वक्ते व कवींची नावे पाहता दिसून येत आहे. त्याचबरोबर जमेल तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची वर्णी लावण्यात आल्याचे दिसत आहे. त्यांत उल्हास पवार, देवेंद्र फडणवीस, सुमित्रा महाजन, सुनील तटकरे, विनोद तावडे, भास्कर जाधव, खा. अनंत गीते, खा. हुसेन दलवाई, सूर्यकांता पाटील, आ. प्रमोद जठार या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय समारोपाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आहेतच. सुनील तटकरे हे तर संमेलनाचे स्वागताध्यक्षच आहेत.
भरगच्च, पण..!
संमेलनाचे उद्घाटन येत्या ११ जानेवारी रोजी संध्याकाळी होणार असून, त्यानंतरचे दोन दिवस (१२ व १३ जानेवारी) सकाळ-संध्याकाळ विविध प्रकारचे १३ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्घाटनानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन वगळता कोणताही कार्यक्रम वेळेअभावी होऊ शकणार नाही, हे लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी (१२ जानेवारी) दिवसभरात आठ कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये दोन परिसंवाद वगळता खुल्या गप्पा, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम यांचाच भरणा आहे. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी (१३ जानेवारी) सकाळपासून ५ कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये ‘परदेशातील मराठीचा जागर’ व ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ हे दोन परिसंवाद, लहान मुलांसाठी ‘बालजल्लोष’ असे साहित्यविषयक गंभीर चर्चा नसलेले कार्यक्रम आहेत.

First Published on January 4, 2013 5:16 am

Web Title: akhil bharatiya marathi sammelan look like become political sammelan