News Flash

‘अभाविप’कडून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

महाराष्ट्रातील मुंब्रा आणि नाशिकमध्येही उमटले पडसाद

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बुधवारी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पाकिस्तानाचा राष्ट्रध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. ‘अभाविप’चे प्रदेशमंत्री राम सातपुते म्हणाले की, पाकिस्तानकडून वारंवार अशा प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या या कृतीमुळे सीमारेषेवर जवान शहीद होत आहेत. या घटना थांबायला हव्यात. सरकारने या घटनेची गंभीरतेने दखल घ्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

जम्मू- काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. २९ जूनपासून या यात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता.

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शिवसैनिकांनी दहशतवादाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवदेन लिहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी  निवेदनावर चक्क स्वतःच्या रक्ताने  सह्या आणि अंगठ्याचे शिक्के दिले आहेत. या निवेदनात बाळासाहेब ठाकरे यांनी गत काळात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुंब्रा

मुंब्रा परिसरातील स्थानिक नगरसेवक अशरफ उर्फ शानू यांच्या कार्यालयापासून राष्ट्रवादी कार्यकर्ते हातात विविध निषेधाचे फलक घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्याजवळ एकत्रीत जमले. या वेळी पाकिस्तान  मुर्दाबाद, हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी अशरफ उर्फ शानू पठाण, शमीम शेख, नगरसेवक राजन किणे यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 3:31 pm

Web Title: akhil bharatiya vidyarthi parishad protest terror attack in pune
Next Stories
1 माझी कर्जमाफी झाली नाही!; काँग्रेस पोहोचवणार सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा ‘आवाज’
2 दापोलीतील घरकुल योजनेत फसवणूक
3 बेंदराच्या सणाकडे बळीराजाची पाठ
Just Now!
X