प्रबोध देशपांडे

मरगळलेल्या जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचालीने वेग घेतला आहे. प्रदेश पातळीवरून जातीय समीकरण लक्षात घेऊन चाचपणी करण्यात येत आहे. इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जिल्हा व महानगर काँग्रेसला लवकरच नवा चेहरा मिळण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात एकेकाळी भक्कम असलेली काँग्रेस नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे गत दोन दशकापासून रसातळाला गेली. राज्यात सत्तेत असतांना जिल्ह्यात काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यात काँग्रेस केवळ नावालाच शिल्लक असल्याची दिसून येते. भारिप-बमसंसोबत आघाडी असतांना १९९९ मध्ये काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर गत २० वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. लोकसभेमध्येही काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. स्थानिक निवडणुकांमध्येही काँग्रेसची कामगिरी सुमारच राहिली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कायम स्वत:चे वर्चस्व राखण्यासाठीच धडपड केली. यामध्ये पक्षाची अतोनात हानी झाली. आता काँग्रेस नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांच्यातही वर्चस्व आणि पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे.

जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने उभारणी करण्यासाठी जिल्हा व महानगरात नेतृत्व बदलाच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. साधारणत: सहा वर्षांपूर्वी हिदायत पटेल यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले. मात्र, जिल्हाध्यक्ष म्हणून ते सक्रिय दिसले नाहीत. त्यांच्या कार्यकाळात पक्षाची चांगलीच वाताहत झाली. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत. आता पक्षाला एकसंघ ठेवणारा नव्या जिल्हाध्यक्षाचा शोध घेतला जात आहे. डॉ.पुरुषोत्तम दातकर, डॉ.अभय पाटील, डॉ.सुधीर ढोणे, प्रकाश तायडे, महेश गणगणे, अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, चंद्रशेखर चिंचोळकर आदी इच्छूक आहेत. जिल्हाध्यक्षसोबतच महानगराध्यक्षही बदलण्याची शक्यता आहे. महानगराध्यक्षपदावर हिंदी भाषिक नेतृत्व दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्या पदासाठी इंटकचे नेते प्रदीप वखारिया, रमाकांत खेतान, नितीन ताकवाले, विजय शर्मा आदींची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत असून, येत्या काही दिवसांत नव्या दमाचे नेतृत्व मिळण्याची दाट शक्यता आहे.

विधान परिषद किंवा पदाची आस

जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांना विधान परिषदेची आमदारकी किंवा संघटनेच्या नेतृत्वाचे पद मिळण्याची आस लागली आहे. त्यासाठी इच्छूक वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे. त्या दोनपैकी एक आपल्या पदरात पडावे, यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात अगोदरच नेतृत्व बदल करण्याचे नियोजन होते. मात्र, करोना आपत्तीमुळे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी.