प्रबोध देशपांडे

अकोला : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांवर आपत्ती कोसळली. अकोल्यातील शेतकऱ्यांनी यामध्येही संधी शोधत त्याचे सोने केले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल  ग्राहकांना थेट घरपोच पोहोचवण्याची साखळी निर्माण झाली आहे. या माध्यमातून ७ कोटी ७१ लाखांच्या भाजीपाला विक्रीची उलाढाल करण्यात आली.

अकोला जिल्ह्यात आत्मामार्फत शेतकरी गट विकसित करण्यात आले आहेत. त्या शेतकरी गटांतील शेतकरी ग्राहकांना थेट घरापर्यंत ताजा भाजीपाला स्वस्त दरात देण्यासाठी सरसावले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हा व जिल्ह्याबाहेरही शेतमाल पाठवला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६९ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. ते भाजीपाला उत्पादन करतात. जिल्ह्यात या शेतकरी गटांचे नागरी भागात ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरू आहेत. या शेतकऱ्यांनी तब्बल ५१४ मेट्रीक टन भाजीपाला व फळांची विक्री केली. या मालाच्या विक्रीतून ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांनी आपल्या विक्री केंद्रामार्फत मोबाइलवर मागणी नोंदवून घेतली. त्यावर प्राप्त मागणीनुसार, मालाचे ‘पॅकिंग’ करून ग्राहकांना घरपोच माल दिला जातो. यासाठी किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, बहुतांश ऑनलाइन पेमेंट स्वीकारणे यासारख्या उपायांचा वापर केला. तसेच गावात किंवा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल विक्री करतात. हा सर्व माल अत्यंत स्वच्छ, ताजा आणि थेट शेतातून ग्राहकांपर्यंत पोहोचतो. माफक दरात ग्राहकांना शेतमाल पुरवला जात आहे. साखळीतील अन्य घटक कमी झाल्याने शेतकऱ्यांना भाव परवडतो. या माध्यमातून शेतकऱ्यांसह ग्राहकांचेही हित साधले जात आहे.

अमरावती विभागात अकोला जिल्हा अव्वल
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गटामार्फत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेत अकोला जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला आहे. टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकही योजनेचा भरभरून लाभ घेत आहेत.

भाजीपाला वितरणाची विशिष्ट पद्धत
सर्व उत्पादने पिशवीमध्ये पाठविल्या जातात. पुरवठा देण्याच्या वेळ निश्चित केल्या जातात व संचारबंदीतील शिथिल कालावधीत सकाळी ८ ते १२ या वेळातच माल पोहोचवला जातो. यामध्ये किमान १०० रुपये किमतीची माल मागवणे आवश्यक आहे. प्रत्येक गट ग्राहकांसोबत समाजमाध्यमाद्वारे जुळला आहे.