लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात करोना संसर्ग वेगाने पसरत असतांना अकोला शहरातील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. शहरात नव्या करोनाबाधिता रुग्णांची वाढ घसरली आहे. करोना संसर्गावर नियंत्रण मिळवणारी कदाचित अकोला महाराष्ट्रातील पहिली पहापालिका आहे, असा निष्कर्ष मुंबई येथील अर्थशास्त्रज्ञ डॉ.नीरज हातेकर यांनी काढला आहे.

अकोला शहरातील करोना स्थितीवर मुंबई येथील डॉ. नीरज हातेकर यांनी एक अहवाल तयार केला. त्यामध्ये शहरात कोविड १९ वर नियंत्रण आल्याचे स्पष्ट करण्यात आले. अकोल्यात ७ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला, तर १३ एप्रिल रोजी शहरात करोनाचा पहिला बळी गेला. २८ एप्रिलपासून रुग्ण सकारात्मक येण्याची सुरू झालेली मालिका अद्यापही निरंतर सुरू आहे. मे, जून आणि जुलैतील पहिल्या आठवडय़ात शहरात झपाटय़ाने रुग्ण वाढ झाली. गेल्या १५ दिवसांपासून अकोला शहरातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. आता तालुकास्तरावरील शहरांसह ग्रामीण भागात रुग्ण वाढीने वेग घेतला आहे.

डॉ.नीरज हातेकरांच्या अहवालातून सुद्धा शहरातील रुग्ण वाढ नियंत्रणात आल्याचे समोर आले आहे. नवीन प्रकरणांची वाढ घसरली. अगदी शुन्याच्या जवळ आला आहे. या अहवालामध्ये शहरातील करोनाबाधित रुग्ण, बाधितांच्या संख्येत होणारी वाढ याचा अभ्यास करण्यात आला. तीन आकृतीमधून अहवालात परिस्थिती मांडण्यात आली. आकृतीतील ‘ग्राफ’वरून परिस्थिती प्रभावीपणे नियंत्रणात येऊन साथीचा रोग पसरत नसल्याचे सांगण्यात आले. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीत सातत्याने वाढ होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

शहरात उन्हाळय़ामध्ये करोना रुग्णांची मोठय़ा संख्येने वाढ नोंदवण्यात आली. करोनाची धास्ती असल्याने लक्षणे असतांनाही ते लपवण्याचे प्रकार घडले. काही जण घरात दडूनही बसले होते. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांचे पालन होत नसल्याची ओरड होती. करोना नियंत्रणासाठी पावले उचलून नमुना संकलन केंद्र वाढवण्यात आले. तपासण्याची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे वेळीच करोनाबाधितांचे निदान होऊन उपचार करण्यास मदत झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनासह अकोला महापालिका यंत्रणेला यश आल्याचे दिसून येते.
मृत्यूदर चिंताजनक
अकोला शहरातील करोना रुग्ण वाढ मंदावली असली तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढतच आहेत. जिल्हय़ातील मृत्यूदरही चिंताजनक आहे. आतापर्यंत जिल्हय़ात १०४ करोनाबाधितांचे बळी गेले असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.
अथक प्रयत्नातून शहरात करोनावर नियंत्रणात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, करोना संसर्गाची परिस्थिती केव्हा बदलेल, हे सांगता येत नसल्याने भविष्यातही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जिल्हा करोनामुक्त होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच राहतील.
– जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.