लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  शहरातील सर्वोपचार रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर व प्रदीप वानखडे यांनी केला आहे.

अकोल्यात करोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याला सर्वोपचार रुग्णालयच जबाबदार असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्य चिकित्सक सुट्टीवर असून प्रभारी अधिकारी निवांत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठातील विलगीकरण कक्षातील संशयित रुग्णांना विविध तपासण्यासाठी प्रशासन त्यांना रुग्णालयात आणते. त्याठिकाणी त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडून देण्यात येते. रुग्णांच्या तपासणीसाठी सात-आठ तासांचा वेळ लागतो. त्या काळात रुग्ण इतरत्र भटकंती करतात, त्यामुळे प्रादुर्भाव वाढतो, असा दावा वंचित आघाडीने केला.

करोनाबाधित बालक रुग्णांना तपासण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाधित लहान मुलांचे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. ऑक्सिजनच्या अभावाने रुग्ण दगावत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत, असा आरोप त्यांनी लावला. कृषी विद्याापीठातील विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी एक्स-रे यंत्र, इसीजी व इतर किरकोळ चाचण्यांची व्यवस्था करण्यात यावी, लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा डॉ.धैर्यवर्धन पुंडकर व प्रदीप वानखडे यांनी दिला आहे.