आकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी ती प्रथमच अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. पारंपरिक सहकार पॅनलविरुद्ध माजी आमदार संजय गावंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलमध्ये जोरदार लढत झाली. त्यात शेतकरी पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले. या कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलच्या सत्तेच्या काळात दीड कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने सहकार पॅनलला पराजयाचा सामना प्रथमच करावा लागला.
आकोट कृषी उत्पन्न बाजर समितीच्या ३० वर्षांत प्रथमच सहकार पॅनलला धोबीपछाड मिळाली आहे. गेल्या ३० वर्षांत सहकारच्या नावाखाली सहकार पॅनलने अर्निबध सत्ता राबविली. या बाजार समितीत दरवर्षी कोटय़वधीची उलाढाल होत होती. मात्र, त्याच वेळी शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावाखाली व्यापारी आणि दलालांची तुंबडी भरली जात होती. शेतकरी यावर नाखूश होते. त्यातच गेल्या ३ वर्षांत सत्तारूढ सहकार पॅनलच्या काळात कृषी उत्पन्न बाजर समितीत बांधकामात दीड कोटीचा भ्रष्टाचार झाला. बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांच्या धाडसी निर्णयामुळे हा भ्रष्टाचार उघड झाला व सहकार पॅनलच्या दिग्गजांविरुद्ध पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले
आहे. शेतकरी पॅनलने बाजार  समितीच्या १८ पकी १६ जागांवर उमेदवार उभे केले व त्यातील ९ विजयी झाले.
सहकार पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले, पण नऊ आपटले. सहकार पॅनलला हा जबर धक्का आहे. मात्र, एक अपक्ष उमेदवार सहकार पॅनलने स्वतकडे ओढल्याने सध्या तरी संख्याबळ दोन्हीकडचे समसमान झाले आहे. परिणामी, सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. राज्यभरात भ्रष्टाचार प्रकरणामुळे गाजलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागले. समितीच्या १८ पकी ९ जागा जिंकून विरोधी शेतकरी पॅनलने बाजी मारली, तर गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या सहकार पॅनलला फक्त ८ जागा मिळाल्या व एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलच्या दिग्गजांना मतदारांनी घरी बसविले. प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये बाजार समितीचे उपसभापती रमेश म्हैसने यांचा समावेश आहे, तर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सभापती रमेश िहगणकर हे निवडणुकीच्या िरगणात नव्हते. सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाचा, तर शेतकरी पॅनलमध्ये शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघाचा समावेश होता. या बाजार समितीत झालेल्या दीड कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा पुतण्या
हरीशसह सभापती रमेश िहगणकर यांच्यावर गुन्हे दाखल करून आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, या निकालानंतर सभापती-उपसभापतीपदासाठी दोन्ही गटांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता आहे.