गेल्या ५ वर्षांपासून स्वामिनी दारूबंदी आंदोलन सातत्याने मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध लक्षवेधी आंदोलने व मोर्चे या माध्यमातून यवतमाळ जिल्हा दारूबंदीची मागणी कधी थेट तर कधी सरकारी-यंत्रणांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आली आहे. या दरम्यान, स्वामिनी जिल्हा दारुबंदी आंदोलन, यवतमाळने गेल्या ५ वर्षांत ७० वेळा आंदोलने केली असून यवतमाळ जिल्हा संपूर्ण दारुबंदीच्या मागणीस येथे स्थानिक पातळीवर आमदारांचा तसेच जिल्ह्यातील असंख्य पीडित परिवारांचा पाठिंबा मिळाला आहे. जवळपास ६०० ग्रामपंचायतींत दारूबंदीचा ठराव पास झाला असून, त्यांपैकी ४०० गावांत यशस्वी दारूबंदी झाली आहे. परंतु सरकारी-यंत्रणा बुद्धीने वा हृदयाने काम करीत नसून निव्वळ कागदी घोडे नाचवीत असल्याचा वेळोवेळी प्रत्यय येत आहे.

स्वामिनी जिल्हा दारुबंदी आंदोलनातर्फे मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली आहेत. नव्याने आखली जाणारी सरकारी धोरणे व त्यातून उद्भवणार्‍या नवनव्या समस्या यांचीदेखील निवेदनात भर टाकण्यात आली आहे. परंतु अजूनही महाराष्ट्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. यवतमाळलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये असलेल्या दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याकडे वेगळ्याने व तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याने आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी प्रशासनाकडे आवाहन केले आहे. अन्यथा दारूचा बेकायदेशीर व्यापार वाढून जनतेची, विशेषतः महिलांची, पिळवणूक वाढत जाईल याकडे ते प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छितात. त्यासाठी

यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवर झालेल्या महामोर्चात “लोकांनी दारूबंदी मागितली तर सरकारने नोटबंदी केली; आता जर त्यांनी दारूबंदी नाही केली तर महिलांनो तुम्ही यावेळी वोटबंदी करा.” असा इशारा यावेळी योगेंद्र यादव यांनी दिला.

आचारसंहिता लागू होण्याआधी दारूबंदी जाहीर झाली नाही तर यवतमाळ मधील जनता येत्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला एक ही मत मिळणार नाही अशी शपथ यावेळी उपस्थित महिला व युवकांनी घेतली.  ही केवळ सामाजिक लढाई नसून आता ही राजकीय लढाई झाली आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्यांना निवडून दिले आहे तेच आमच्या संसारावर नांगर फिरवत असतील त्यांना आम्ही सत्तेतून खाली खेचू असं यावेळी स्वामिनीचे प्रणेते महेश पवार यांनी जाहीर केले.

“आम्ही तुम्हाला मत देणार आणि तुमची दारू विक्री आमच्या लोकांना मौत देणार हा सौदा काही बरोबरीचा नाही. आता तुम्ही दारूबंदी द्या नाहीतर तुम्हाला आम्ही निवडणुकीत मात देऊ.” असा निर्वाणीचा इशारा महेश यांनी दिला.

पोस्टल ग्राऊंडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्च्यात खालील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांसाठी महेश पवार यांनी जिल्हाधिकारी यांना सर्वांच्या वतीने दिले.

मोर्च्यातील प्रमुख मागण्या :
१.  यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी घोषित करण्यात यावी.
२.  दारुबंदी संदर्भातील कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
३. गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तीपथ’ प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व सर्च संस्था यांनी दारुनियंत्रणाचा पथदर्शी प्रकल्प प्रभावीरीत्या चालविला आहे. त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीनंतर पुढील दारू नियंत्रण करावे.