नेवाशातील कारखान्यावर छापा, सहा जणांना अटक

नगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाने नेवाशामधील सॅनिटायझर निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून, सॅनिटायझर निर्मितीच्या नावाखाली मद्यार्क खरेदी करून ते दारू निर्मितीसाठी छुप्या पद्धतीने विकले जात असल्याचा प्रकार उघड केला आहे. विभागाच्या पुणे व नगर येथील पथकाने संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली. या छाप्यात २० लाखांच्या मद्यार्कासह सुमारे ६६ लाख रुपयांचा ऐवज जप्त  केला. नेवाशातील या कारखान्याला लातूरमधील एका खासगी साखर कारखान्याकडून अवैध मद्यार्क उपलब्ध केल्याचे तपासात आढळले आहे.

नेवासे तालुक्यातील भांगे ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारखान्याचा मालक संजय भाऊसाहेब भांगे याच्यासह उस्मान सय्यद शेख, ज्ञानेश्वर विष्णू मगर, तानाजी सखाराम दराडे, श्यामसुंदर वसंतराव लटपटे व शिवाजी भागूजी शिंदे अशा सहा जणांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक केली आहे. श्यामसुंदर लटपटे हा लातूरमधील सिद्ध शुगर अँड अलाईड लिमिटेड कंपनीच्या गोदामाचा व्यवस्थापक आहे तर शिवाजी शिंदे हा कारखान्याचा सरव्यवस्थापक आहे.

पुण्याच्या पथकाने गेल्या जानेवारीत केलेल्या कारवाईत नगरमधून पुणे जिल्ह्यात अवैधरीत्या मद्यार्क वाहतूक होत असल्याचे उघडकीस आणले होते. या गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आठवडय़ातून एकदा चौकशीसाठी हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. या संशयितांनी नगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी सॅनिटायझर निर्मितीकरिता छुप्या पद्धतीने मद्यार्क आणले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. सद्यस्थितीत करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात अवैधरीत्या मद्यनिर्मिती व विक्री होऊ नये यासाठी गांभीर्य लक्षात घेऊन पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, नगरचे अधीक्षक पराग नवलकर यांनी नेवासा तालुक्यातील भांगे ऑरगॅनिक केमिकल या कंपनीच्या कारखान्यावर छापा टाकला. या कंपनीने सॅनिटायझर निर्मितीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे परवानगी अर्ज दाखल केला होता, मात्र परवानगी मिळण्यापूर्वीच मद्यार्क छुप्या पद्धतीने आणण्यात आले होते, असे अधीक्षक नवलकर यांनी सांगितले.

कारवाईत दोन टँकरसह सुमारे ४० हजार लिटर मद्यार्क जप्त करण्यात आले आहे. बाजारात या मद्यार्काची किंमत २० लाख ६७ हजार रु पये आहे. त्यासह एकूण ६६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

नगरचे अधीक्षक नवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शुद्ध व विपकृत अशा दोन पद्धतीचे मद्यार्क उपलब्ध असते. साधारण औद्योगिक वापर व दारू निर्मिती अशासाठी त्याचा वापर होतो. सॅनिटायझरसाठी तयार करण्यासाठी मद्यार्कात एक प्रकारचा कडवटपणा येईल, असे निळ्या रंगाचे रसायन टाकले जाते. पुरवठा करताना कागदोपत्री तसे दाखवण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात शुद्ध मद्यार्क पुरवण्यात आले. भांगे ऑरगॅनिक केमिकल कारखान्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न व औषध विभागाला पाठवला जाणार आहे.