गेले ४८ दिवस बंद असलेली मद्यविक्रीची दुकाने आज गुरुवारी उघडली जाणार असल्याची आवई उठल्यानंतर भल्या सकाळपासून सोलापुरात काही मद्यविक्री दुकानांसमोर मद्यग्राहकांच्या भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. पण सर्वाचाच भ्रमनिरास झाला. दुकाने काही उघडली नाहीत. मात्र गर्दी केल्यामुळे पोलिसांच्या ‘लाठी’चा प्रसाद मिळाला.

शासनाने टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांचा अपवाद वगळता इतरत्र ठिकाणी देशी-विदेशी दारू दुकानांसह बिअर दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यात त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.

सोलापुरात १९ ठोक मद्य विक्रेत्यांना ठोक मद्य विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु किरकोळ विक्रे त्यांना दारू विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रलंबित ठेवला आहे. या संदर्भात प्रशासकीय स्तरावर बैठका होत असताना काल बुधवारी किरकोळ मद्य विक्रेत्यांना दुकाने उघडण्याचे संकेत मिळाले होते. त्या अनुषंगाने बऱ्याच विक्रे त्यांनी दुकाने उघडण्याची तयारी केली आहे. यात मद्य ग्राहकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी मद्याची विक्री टोकन पद्धतीने करण्यापासून ते दुकानासमोर सामाजिक अंतर राखण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या अंतर पट्टय़ा आखण्यापर्यंत सर्व तयारी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच आज गुरुवारी ठरावीक चार मद्य दुकाने उघडणार असल्याची आवई उठविण्यात आली आणि लगेचच अनेक दुकानांसमोर मद्य ग्राहकांची गर्दी होऊ  लागली.

गोल्डफिंच पेठेतील आसार मैदानासमोरील एका मद्य दुकानासमोर तर सकाळी सातपासून मद्य ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा मद्य खरेदीसाठी असल्याचे दिसून येताच रस्त्यावरील इतरांनीही रांगा लावल्या. रांगांमध्ये बऱ्याचजणांनी चप्पल, पिशवी व अन्य वस्तू ठेवून स्वत:चे आरक्षण निश्चित केल्याचे चित्रही पाहावयास मिळाले. मद्य ग्राहकांच्या रांगा सुमारे एक किलोमीटपर्यंत लकी चौक पार करून पुढे जात असताना शेवटी तेथे पोलीस धावून आले. एवढय़ा मोठय़ा रांगा पाहून मद्य दुकाने उघडणार असल्याचा पोलिसांचा समज झाला होता. यातच गर्दी आणखी वाढू लागली तशी गोंधळही सुरू झाला. एव्हाना, मद्य दुकान उघडणार म्हणून त्या आसपास चणे-फुटाणे, सोडा, पाणी विकण्यासाठीही काही छोटे व्यापारी येऊ न बस्तान बसवू लागले. मद्य खरेदीसाठी लागलेल्या रांगांमध्ये सर्व थरातील मंडळी दिसत होती. काही बडे श्रीमंत आपल्या नोकरांना रांगेत उभे करीत होते. काही बेकार तरुणांना रांगेत उभे राहण्यासाठी चक्क रोजगारही मिळाल्याचे सांगण्यात आले.

तथापि, गर्दी वाढत गेली आणि गोंधळही वाढला. प्रत्यक्षात मद्य दुकान उघडणार नसल्याची खात्री झाली. तेव्हा अनावर गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यात कोणालाही दारू मिळाली नसली, तरी त्यातील बऱ्याच दर्दी मंडळींना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला.