५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

वसई पूर्वेत गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करून वालीव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून ५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वेतील मौजे मालजीपाडा गावच्या हद्दीत नागोबा मंदिराच्या बाजूला, खाडीकिनारी दलदलीमध्ये गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वालीव पोलिसांनी तेथे धाड टाकून गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करून आरोपी पराग दिनकर पाटील याला अटक केली आहे. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून ३० हजार रुपये किमतीचे सफेद रंगाचे एकूण १५ प्लास्टिक बॅरेल, त्यामध्ये प्रत्येकी २०० लिटर गूळ-साखर, नवसागरमिश्रित वॉश असे एकूण ३००० लिटर वॉश रसायन, ५०० रुपये किमतीचे १ स्टीलचा गावठी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी लागणारे साधन (चाटू), ११ हजार रुपयांचे अ‍ॅल्युमिनियम धातूचे भांडे, ५ हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याकरिता लागणारी लाकडे, १० हजार रुपये किमतीचा पाण्याचा पंप असा एकूण ५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वालीव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सातपाटीमध्ये कारवाई

ल्ल पालघर : सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील मुरबे भट्टीपाडा परिसरात सातपाटी पोलिसांनी गावठी हातभट्टी बनवण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिला आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

ल्ल या कारवाईत पोलिसांनी १०,४६० रुपयांचे गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे हातभट्टीचे साहित्य जप्त केले आहे. वैजयंती रवींद्र वैती असे या महिलेचे नाव असून ही महिला बेकायदा हातभट्टीची गावठी दारू बनविण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ल्ल पोलिसांनी मंगळवारी या ठिकाणी छापा टाकून हा अड्डा उद्ध्वस्त केला. आरोपी वैजयंती हिच्याविरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.