कोल्हापूर शहरातील करोना विलगीकरण केंद्रामध्ये दारू- मटणाची पार्टी झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बाटलीबंद पाण्याच्या बॉक्समधून मद्य केंद्रात आणले जात होते. शनिवारी मद्याच्या बाटल्या केंद्र व्यवस्थापकाने हस्तगत केल्या आहेत. प्रशासन याबाबत कोणती कारवाई करणार याकडे लक्ष  लागले आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील जवळपास दहा पेक्षा अधिक इमारतीमध्ये आवश्यक असणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. धार्मिक संस्थेच्या इमारती, शाळा, वस्तीगृह आदी  सेवाभावी वृत्तीने या वास्तू रुग्णांवरील उपचारासाठी वापरासाठी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, जे नागरिक १४ दिवसांसाठी येथे  दाखल होत आहेत, त्यांची या केंद्रावर ओली पार्टी रंगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रामध्ये मटण आणि दारूसह ओली पार्टी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या इमारतीच्या कडेला दारूच्या बाटल्यांचा अक्षरश: खच पडला होता. या संस्थेच्या प्रशासनाने नेमलेल्या सबंधित कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आणून देवूनही याकडे दुर्लक्षकरण्यात आले. त्यावर या इमारतीच्या संबंधीत व्यवस्थापकानेच शनिवारी रात्री या केंद्रात आणल्या गेलेला मद्याचा साठा स्वत:च पुढाकार घेवून जप्त केला. प्रशासनाकडून कारवाईची संकेतही देण्यात दिले आहेत.  प्रशासन रविवारी दिवसभर या प्रकरणाची छायाचित्रांसह चर्चा करीत असताना चकार शब्द काढताना दिसले नाही.