मुंबईत झालेल्या विषारी दारू दुर्घटनेमुळे गांधारीचे सोंग घेतलेल्या जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाला मंगळवारी खडबडून जाग आली असून १० ठिकाणचे गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करीत पाचजणांना अटक करण्यात आली. शहरी भागात धाब्यावर होणारी राजरोस हुबळीमेड दारूची विक्री, परमिट रूममध्ये अवाजवी दराने होणारी दारू विक्री याकडे कानाडोळा करणाऱ्या  या विभागाचा प्रसिध्दीसाठी चाललेला खटाटोप वाखाणण्याजोगा असल्याचे समोर आले.
जिल्ह्यात शहरी भागात अनेक धाब्यावर हुबळी मेड दारूची राजरोस विक्री होत असताना केवळ तपासणीचा सोपस्कार पार पाडण्याचे काम हा विभाग कागदोपत्री करीत असल्याची टीका होत असते. सरकारमान्य दारू दुकानाची वेळ सकाळी १० ते रात्री १० असताना दिवस उगवताच शहरी भागासह ग्रामीण भागातील दुकाने सुरू होतात आणि मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतात. केवळ शुल्क वसुलीतील टाग्रेट वाढविण्याकडे लक्ष असलेल्या या विभागाचे बिअर शॉपीमधून होणारी दारू विक्री लक्षात न घेता डोळेझाक करण्याची भूमिका अंगलट येत नाही तोपर्यंत आबादीआबाद असल्याचे सांगितले जाते. परमिटरूममध्ये विक्री करण्यात येणाऱ्या मद्याचे दर किती असावेत याचे कोणतेही बंधन नसल्याने राजरोस लुटीचे समर्थन करताना या विभागाचे अधिकारी दिसतात.
जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा या दुष्काळी भागात गावठी दारू अड्डे राजरोस सुरू असताना अचानक जागे झालेल्या पथकाने धाडी टाकण्याचा फार्स केला आहे. छाप्यात किरकोळ दारू पकडून प्रसिध्दीमाध्यमांपर्यंत छाप्याच्या बातम्या देण्यात अधिकारी वर्गाने दक्षता घेतली आहे. डफळापूर, जत, पांडोझरी, उमदी, गवळे आणि आटपाडी येथील दहा गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकण्याचा सोपस्कार आज पार पाडण्यात आला. या ठिकाणाहून रसायन, प्लॅस्टिक कॅन आदी माल हस्तगत करण्यात आला असून १० ठिकाणाहून अवघे पाचजण पथकाच्या तावडीत सापडले.
आजपर्यंत गांधारीचे सोंग घेणाऱ्या या विभागाला गावठी दारूचे अड्डे शोधण्यासाठी मुंबईतील दारूकांड घडण्याची प्रतीक्षा होती की काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात िशदीच्या विक्रीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. यावर या विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. अथवा दर महिन्याला परमिटरूम व मद्यालयातून विक्री होणाऱ्या मद्याची केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात धन्यता मानण्यात येत आहे.