News Flash

दारु पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाची आई-वडिलांनी सुपारी देऊन घडवली हत्या

मुलीच्या मदतीने भाडोत्री गुंडांकरवी काढला काटा

संग्रहित छायाचित्र

दारू पिऊन मालमत्तेतील हिश्श्याची मागणी करीत सतत मारहाण करणाऱ्या मुलाला आई-वडिलांनी आपल्या मुलीच्या मदतीने सुपारी देऊन ठार केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलिसांनी हा कट उघडकीस आणला. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मौजा खेड परिसरात एक व्यक्ती शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळल्याची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर मृत व्यक्तीचे नाव चंद्रभान मडुजी झरकर असल्याचेही समोर आले. ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार त्यांनी झरकर याच्या कुटुंबियांकडे याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रभान आपल्या पत्नीसह उमरेड येथे वास्तव्याला होता. आई-वडील राहत असलेल्या नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथे येऊन तो वारंवार मालमत्तेमधील हिश्श्याची मागणी करीत असे. आई-वडील आणि बहिणीची कसून चौकशी केली असता चंद्रभान सतत मारहाण करीत असल्याचीही माहिती समोर आली. त्यातून मुलगी शोभा हीच्या माध्यमातून चार भाडोत्री गुंडांना ५० हजार रुपयांची सुपारी देऊन चंद्रभानची हत्या केल्याचे त्यांनी कबूल केले.

ब्रम्हपुरी पोलिसांनी मृत चंद्रभानचे वडील मडू बिसन झरकर, आई सुमित्रा मडू झरकर, बहीण शोभा गुंडे आणि सुपारी घेणारा धनराज निखाडे यांना अटक केली आहे. उर्वरीत आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 9:28 pm

Web Title: alcoholic son murdered by parents in chandrapur aau 85
Next Stories
1 राज्यात करोनाचा स्फोट! आतापर्यंतची दिवसभरातील सर्वात मोठी वाढ
2 “… मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं”
3 शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाला भाजपा नेत्या रहाटकर यांनी दिलं उत्तर; म्हणाल्या…
Just Now!
X