दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ई-रुग्णालय म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र दीड वर्षांनंतरही हा प्रकल्प कार्यान्वयित होऊ शकलेला नाही. त्यामुळे ई-रुग्णालयासाठी पुरवण्यात आलेली संगणकीय प्रणाली धूळ खात पडली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे संगणकीकरण केले जाणार आहे. सुरुवातीला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे.  ई-रुग्णालय नामक या योजनेतून रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, बाह्य़रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग संगणकांनी जोडले जाणार आहेत. दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी आणि रुग्णालयातील कागदांचा अपव्यय टाळावा, रुग्णाचे आजार आणि त्यावरील उपचारांची अचूक नोंद (डॉक्युमेंटेशन) ठेवता यावी हा यामागचा मूळ उद्देश आहे.

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत रुग्णालयासाठी ६० लाख ९४ हजार रुपये किमतीची साधन सामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ५८ संगणक, १० टॅबलेट, २ िपट्रर आणि २ सव्‍‌र्हर आणि इतर साधन सामग्रीचा समावेश आहे.

हे सर्व संगणक विविध विभागात बसवणे अपेक्षित होते. त्यानंतर सर्व संगणक सव्‍‌र्हरला जोडले जाणार होते. यासाठी सिडॅक या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दैनंदिन कामकाजातील गरजा लक्षात घेऊन सिडॅक ही संस्था ई-रुग्णालयासाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करणार होते. संगणकाच्या वापरासाठी जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना १ महिन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार होते.

सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ई-रुग्णालय सेवा तीन महिन्यांत कार्यान्वयित होणे अपेक्षित होते. मात्र या घटनेला आज दीड वर्ष लोटले आहे. मात्र ई-रुग्णालय सेवा कार्यान्वयित होऊ शकलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. ई-रुग्णालय सेवा सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा रुग्णालयात पडून आहे. ज्या संस्थेची या प्रकल्पासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तिने अजून संगणक आणि सव्‍‌र्हर बसवण्याचे काम पूर्ण केलेले नाही. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच योजना कार्यान्वयित होईल अशी अपेक्षा आहे, असे अलिबागचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. डी. ननावरे यांनी सांगितले.  या प्रकल्पामुळे रुग्णांवर करण्यात येणारे उपचार, त्याची आरोग्यविषयक माहिती, तपासण्या, क्ष किरण यांचा तपशील रुग्णालयाच्या संगणकात संकलित केला जाऊ शकेल. त्यामुळे रुग्णांवर अचूक उपचार होण्यास मदत होईल आणि वेळ आणि पशाची बचत होऊ शकेल, असे भाजयुमोचे तालुका अध्यक्ष मंगेश माळी यांनी सांगितले.