News Flash

अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा संशय आहे

महाड येथील विषबाधा प्रकरण ताजे असतांनाच रायगड जिल्ह्यात आणखी एक विषप्रयोगाचे प्रकरण समोर आले आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील एकाच कुटूंबातील ५ जणांनी विषप्रयोग करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबई आणि अलिबाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील एकाच कुटूंबातील ५ जणांनी विषप्रयोग करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये २ महिला, १ पुरुष आणि २ जुळ्या बालकांचा समावेष आहे. रामचंद्र पाटील (वय ६०), रंजना पाटील (५०), कविता पाटील (२५), स्वराली पाटील (दीड वर्ष), स्वराज पाटील (दीड वर्ष) अशी या पाच जणांची नावे आहेत. या घटनेमागील कारणांचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही.

रामचंद्र पाटील हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. ते आपली पत्नी, सून आणि दोन नातवंडांसमवेत आक्षी येथे वास्तव्य करतात. मुलगा राहूल हा कामा निमित्ताने ठाण्यात राहतो. दररोज सकाळी उठून पाटील कुटूंब आपापल्या कामाला लागत असे. मात्र बुधवारी दुपारी १२ पर्यंत घरात काहीच हालचाल दिसत नसल्याने शेजारच्यांनी विचारपूस करण्यास सुरवात केली. घरात काहीच हालचाल नसल्याने अखेर आसपासच्या लोकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी रामचंद्र पाटील, रंजना पाटील आणि कविता पाटील हे तिघंही बेशुध्दावस्थेत आढळून आले. तर लहान मुले त्यांच्या शेजारी असल्याचे दिसून आले. यानंतर पाचही जणांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर रामचंद्र पाटील, रंजना पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मात्र कविता, स्वराज आणि स्वराली या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले.

ही घटना कळताच उपविभागीय अधिकारी डी. बी. निघोट व अलिबाग पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र या घटनेमागचे कारण अद्याप कळलेले नाही. पोलिसांनी विषाची बाटली ताब्यात घेतली आहे. तर पुढील तपास अलिबाग पोलीस निरीक्षक दशरथ पाटील करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 3:32 pm

Web Title: alibag family attempted suicide in akshi 5 admitted in hospital
Next Stories
1 विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राचा रंगही शाळा ठरवणार, पुण्याच्या शाळेत अजब अटी; पालक संतप्त
2 नागपूर – वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० विदर्भवाद्यांना अटक
3 …अन् संभाजी भिडेंच्या वेशभूषेत विधिमंडळात आले राष्ट्रवादीचे आमदार
Just Now!
X