News Flash

अर्णब गोस्वामी अटक: अलिबाग न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आलं होतं

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अर्णब गोस्वामी यांच्यासोबत फिरोज शेख आणि नितेश सारडा या दोघांना वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी बुधवारी अटक केली. अलिबाग न्यायालयात हजर केलं असताना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने मागणी फेटाळून लावली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

अर्णब यांना बुधवारी अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. फेरवैद्यकीय तपासणीनंतर हा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला. यानंतर अर्णब व इतर दोन आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद सुरु झाला. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रकरणासाठी रात्री उशिरापर्यंत अलिबाग येथील न्यायालय सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ होती.

अर्णब गोस्वामींच्या वतीने वकील गौरव पारकर, फिरोज शेख यांच्यावतीने वकील निहा राऊत तर नितेश सारडा यांच्यावतीने वकील सुशील पाटील यांनी बाजू मांडली. तर सरकारी अभियोक्ता म्हणून वकील रुपेश महाकाळ यांनी काम पाहिले. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी न्यायालयात तपासात काही निष्पन्न झाले नाही असा अहवाल दिला आहे. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. हा अहवाल मागे घेऊन फेरतपास करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला असला तरी न्यायालयाने त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा यावेळी आरोपींच्या वतीने उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरला.

या प्रकरणाच्या फेरतपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत. त्यांचा तपास करायचा आहे. मागील तपासात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. साक्षीदारांना तपासण्यासाठी आरोपींची गरज आहे. या प्रकरणातील कागदपत्रं ताब्यात घेऊन तपासायची आहेत त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे अशी मागणी सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आली. मात्र आरोपींच्या वकीलांनी हा युक्तीवाद खोडून काढला.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ‘आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. पोलीस कोठडीसाठी योग्य संयुक्तिक आणि सबळ कारण देता आली नाही. अ समरी रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा फेरतपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू यां घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्थापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही,’ असं निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. तिनही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 9:58 am

Web Title: alibaug court hearing on republic tv arnab goswami arrest anvay naik suicide case sgy 87
Next Stories
1 …म्हणून अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळाली नाही, जाणून घ्या कारणं
2 “नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल”
3 खोपोलीमध्ये स्फोटानंतर भीषण आग, चार किमीपर्यंत स्फोटाचा आवाज; एक ठार चार जखमी
Just Now!
X