अलिबागने दिलेल्या प्रेमामुळे आणि केलेल्या संस्कारामुळे आज एवढा मोठा होऊ शकलो, असे मत अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले. ते अलिबाग इथे आयोजित अलिबाग अस्मिता अभियानाच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते.
माझा जन्म अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. क्रीडा भवनाच्या क्रीडांगणावर मी सायकल चालवायला शिकलो. माझ्या आईवडील आणि काकांनी तुटपुंजा पगारात मला चांगले शिक्षण देण्याचे काम केले. अलिबागने मला जिवापाड प्रेम दिले आणि संस्कारही केले, त्यामुळे आज मी मोठा होऊ शकलो, असे मत अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले. गेल्या चार वर्षांत ७५ वेळा मी परदेशात जाऊ शकलो आहे, तर राज्यात जिथे जिथे फिरलो आहे तिथे लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे. ही अलिबागची पुण्याई असल्याचेही आदेश बांदेकर यांनी सांगितले. अलिबागच्या प्रत्येक गल्लीत माझ्या आठवणी दडल्या आहे. मी अलिबागचा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात प्रत्येकाने आपल्या आचरणातून अलिबागची अस्मिता जोपासण्याचे काम केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ कसोटीपटू उमेश कुलकर्णीदेखील उपस्थित होते. आपल्या जडणघडणीत अलिबाग आणि इथल्या लोकांचे महत्त्व त्यांनी सांगितले. अलिबाग ते मुंबईदरम्यानच्या प्रवासात सोसलेल्या हालअपेष्टांचे वर्णन त्यांनी केले. अलिबागमधून चांगले खेळाडू तयार व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘एबीपी माझा’च्या वृत्त निवेदिका कविता राणे यांनी अलिबागमधील शिक्षण, बातमीदारीचे अनुभव या वेळी सांगितले. येणाऱ्या काळात अलिबाग परिसराचा झपाटय़ाने विकास होणार आहे. म्हणून काळाबरोबर आपल्यालाही सकारात्मक बदल घडवावे लागणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
बालगायिका मुग्धा वैशंपायन हिने अलिबागवर गाणे सादर करून आपल्या भावनांना वाट करून दिली. ज्येष्ठ नेते दत्ता खानविलकर यांनी अलिबागच्या बदनामीची परंपरा सुरू करण्यात साहित्यिकांचा वाटा कसा होता हे विशद केले, तर हिंदी चित्रपटांतून होणाऱ्या अलिबागच्या बदनामीला रोखण्यासाठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांना नोटीस द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी अलिबाग अस्मिता अभियानाचे प्रास्ताविक केले, तर माजी आमदार मधुकर ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.