ज्या जमिनीत कुसळही उगवण्याची शक्यता मावळली होती, अशा जमिनीत हिरव्यागार करून तेथे उसाचा गोडवा निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे हे धाडसीपणाचे लक्षण होते. पण त्याहून अधिक धैर्य होते ते क्षारपड जमिनीसाठी कर्जपुरवठा करण्याचे. असे धैर्य एका सहकारी बँकेने दाखवले; तेव्हा बँकेच्या व्यवस्थापनाला वित्तीय क्षेत्रातून चक्क वेड्यात काढले गेले. पण आता परिस्थिती ३६० अंशात बदलली आहे. क्षारपड जमीन सुधारणेसाठी कर्ज घेतलेल्या शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जाची फेड मुदतीपूर्वीच केली आहे. शिवाय, मृतवत जमीन आता कायमस्वरूपी लक्ष्मीचे वरदान ठरल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारा आनंद अवर्णनीय ठरला आहे. गुरुवारी १६२ शेतकऱ्यांनी सुमारे ४ कोटी १२ लाख रुपये इतक्या रकमेची कर्जफेड करून प्रकल्पाची यशस्विता अधोरेखित केली.

कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यात हजारो एकर जमीन क्षारपड बनलेली आहे. यातील एका तालुक्‍यातच सुमारे २० हजार शेतजमीन क्षारपड बनली आहे. या जमिनीत गेली २० वर्षे काहीही उगवत नाही. अशी नापीक बनलेली जमीन विकत घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. जगाच्या दृष्टीने नव्हे तर जमीन मालक शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा या जमिनी बेदखल बनल्या होत्या.

खचलेल्या मनोधैर्याची मशागत

क्षारपड जमीन सुधारणा निर्मूलनाचे वेगवेगळे प्रयत्न शेतकरी, शासन पातळीवर झाले होते. मात्र त्याला अपेक्षित यश आले नव्हते. या सर्वाला वेगळे वळण दिले ते शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याचे अध्यक्ष, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी. भूमिगत जल निचरा पद्धतीने क्षारपड जमीन निर्मूलन करण्याचा वेगळा उपक्रम राबवण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. पण क्षारपड निर्मूलनाचे यापूर्वीचे प्रयत्न फलदायी ठरले नसल्याने, पुन्हा नव्याने असा काही प्रयत्न करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नव्हती. मनोधैर्य खचलेल्या या शेतकर्‍यांना गणपतराव पाटील यांनी दिलासा दिला. केवळ उभारी देऊन न थांबता स्व. सा. रे. पाटील उदगाव सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रती एकरी एक लाख रुपये अल्प व्याजाने ७ वर्षाच्या मुदतीसाठी १३ कोटी ४२ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातून गणेशवाडी, आलास, शेडबाळ येथील सुमारे १ हजार शेतकरी १५०० एकर जमीन सुधारणेच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले.

वेडेपणाचा ध्यास फलदायी

याकरिता बँकेने १२ कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज दिले. उदगाव बँक व गणपतराव पाटील करीत असलेले हे वित्तीय धाडस अभ्यासकांच्या लेखी मात्र चुकीचे पाऊल होते. बँकांच्या दृष्टीने जिंकणाऱ्या घोड्याला मदत केली जाते; पराभूत ठरणाऱ्या घोड्याकडे दुर्लक्ष केले जाते. क्षारपड जमीन सुधारणेचा एकूण पूर्वानुभव या जमिनी ‘पराभूत घोड्या’ सारख्या असल्याने, त्यावर कर्ज देण्याचा विचार मनात येणे हाच मुळात वेडेपणा होता. मात्र वेडेपणाचा ध्यास घेतल्याशिवाय कार्यसिद्धी होऊ शकत नाही, या जिद्दीने गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना क्षारपड निर्मुलनासाठी प्रवृत्त केले. त्यातील पहिल्या ७० शेतकऱ्यांनी बँकेकडे धनादेश देवून बँकेच्या धाडसाला सलाम केला आहे.

हिरव्या स्वप्नाची यशकथा

या शेतकर्‍यांनीही सन २०१७ पासून क्षारपड जमीन सुधारणेकडे आणि शेती कसण्याकडे बारकाईने लक्ष दिले. पहिल्याच वर्षी या प्रयत्नाला यशाचे अंकुर बहरून आले. पुढच्या टप्प्यात त्यांनी उसासारखे नगदी पीक घेतले. त्याचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात आले. सलग तीन वर्षांमध्ये शेती बहरली आहे. त्यातून प्राप्त उत्पन्नातून या शेतकऱ्यांनी मुदतपूर्व कर्जफेड केली आहे. एकीकडे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडून आयुष्याचा शेवट करत असल्याच्या घटना घडत असताना अल्पावधीत ज्या जमिनीतून काहीही पिकण्याची अपेक्षा नव्हती; त्यातून हिरवे स्वप्न पेरून शिरोळच्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा मार्ग यशस्वी केला आहे. इतकेच नव्हे, तर या येथून पुढे सातत्याने त्यांच्या घरी लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसणारच  आहे.