प्रबोध देशपांडे

करोनाचा फटका जगप्रसिद्ध खमंग शेगाव कचोरीलाही बसला. शेगाव कचोरीच्या ७० वर्षांच्या इतिसाहात प्रथमच २५ दिवसांपासून हा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.  देशभरातील २५ हजार केंद्रांवर या माध्यमातून सव्वा लाख जणांना रोजगार मिळतो.

शेगावला संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांची पावलं शेगाव कचोरी केंद्राकडे वळतात. ५ जून १९५० रोजी फाळणीनंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिरथराम शर्मा यांनी शेगाव रेल्वेस्थानकाजवळ कचोरी केंद्र स्थापन केले. गत ७० वर्षांत स्वादिष्ट शेगाव कचोरीचा स्वाद जगभरात पोहोचला. २०१० नंतर विविध राज्यांमध्ये शेगाव कचोरी केंद्रांचा विस्तार झाला. काही ठिकाणी शेगाव कचोरी १० रुपयांत तीन नग या नाममात्र दरातही मिळते. त्यामुळे शेगाव कचोरी आवडीने आस्वाद घेण्यासोबतच हजारो गरिबांच्या पोट भरण्याचे साधनही झाली आहे.

देशभरात २५ हजार केंद्रे

तिरथराम शर्मा यांचे नातू गगन शर्मा आता त्यांचा ‘आयएसओ’ दर्जा मिळालेला संतनगरीतील मुख्य शेगाव कचोरीचा व्यवसाय सांभाळतात. हा पदार्थ शेगावपुरतेच मर्यादित राहिला नाही. खवय्यांची पसंती ओळखून मुंबई, पुणे, नागपूर, अकोल्यासह संपूर्ण राज्य व राज्याबाहेरही छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये अनेकांनी शेगाव कचोरीचे दुकाने थाटली.  शेगाव कचोरी केंद्रांची सर्व ठिकाणची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. या माध्यमातून सव्वा लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला. या व्यवसायात दैनंदिन उलाढाल आठ कोटी रुपयांची होते.

शेगाव कचोरी केंद्रांना कच्चा माल पुरवणारे पुरवठादारांवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. यासंदर्भात गगन शर्मा म्हणाले, ‘आतापर्यंत कुठल्याही संकटात एवढे दिवस व्यवसाय बंद नव्हता. १९९१ मध्ये एका अपघातामुळे नागझरी येथील पूल नादुरुस्त झाल्याने २० दिवस रेल्वे बंद होती. मात्र, त्यावेळीही रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरवठा सुरूच होता. आता या बंदमध्ये आमच्याकडच्या २२ कामगारांची सोय केली आहे. व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.’ टाळेबंदी संपल्यानंतर शेगाव कचोरीचा व्यवसाय नव्याने उभा करण्याचे मोठे आव्हान असेल, असे गगन शर्मा सांगतात. आगामी काळात व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. यावर मात करण्यासाठी किमान बँकांनी अर्थसाहाय्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.