‘सर्व व्यवस्थित आहे, फक्त थोडे थांबा’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे कोण? याची उत्सुकता जवळपास संपुष्टात आली असून, चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपने पहिल्या यादीतच राष्ट्रवादीतून आलेल्या डी. बी. पाटील यांना संधी दिली. मात्र, २० दिवस झाले तरी महायुतीने प्रचारास प्रारंभ केला नाही. दुसरीकडे काँग्रेस उमेदवाराची घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे. विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांच्या नावाला जिल्ह्याच्या बहुतांश भागातून विरोध असल्याने पक्षाची उमेदवारी कोणाला, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा अशोक चव्हाण यांनी पत्नी अमिता चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह स्वतच्या नावाचीही चाचपणी केली.
दहा दिवसांपासून येथे तळ ठोकून असलेल्या चव्हाण यांनी जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या आयटीएमच्या कार्यालयात त्यांनी कोणाला उमेदवारी मिळाली तर कशी परिस्थिती राहील, याचा अंदाज घेतला. या वेळी बहुतांश भागातील कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही स्वतच उभे राहा’ असा आग्रह धरला. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण? हे अजून जाहीर झाले नसले, तरी चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. ‘सर्व व्यवस्थित आहे, फक्त थोडे थांबा’ अशा शब्दांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
भाजपने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असली, तरी काँग्रेसने नाराजांची मनधरणी करताना अन्य पक्षांतील असंतुष्टांना जवळ ओढण्याची मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कसे विश्वासात घ्यावे, याची खलबते सुरू आहेत.