News Flash

नाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी

नाणारच्या तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी म्हणूनच सर्वाची जणू शर्यत लागली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सतीश कामत, रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील नाणारच्या परिसरात तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारण्याबाबत सौदी अरेबियांच्या अराम्को कंपनीबरोबर झालेल्या सामंजस्य करारानंतर निर्माण झालेल्या वातावरणात सर्व प्रमुख विरोधी पक्ष नाणारच्या तव्यावर आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांना लागले आहेत.

केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये राहूनही आपल्या ‘थोरल्या’ भावाला झोडपण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना येथेही त्याबाबत आघाडीवर आहे. अर्थात त्याला स्थानिक राजकारणाची प्रदीर्घ पाश्र्वभूमी आहे. कोकण हा सेनेचा बालेकिल्ला असून राजापूर तालुक्यातून सेनेचा प्रतिनिधी विधानसभेवर सातत्याने निवडून येत आहे. हा गड शाबूत ठेवणे ही सेनेची  गरज आहे. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलन असो किंवा नाणार, ‘आम्ही स्थानिक जनतेबरोबर’ अशी चलाख भूमिका हा पक्ष घेत आला आहे. या विषयासंदर्भात मात्र त्यांची अशी पंचाईत झाली आहे की, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. जागा निवडीपासून भूसंपादन करून संबेधित कंपनीला ती सुपूर्द करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उद्योग खात्यावर आहे. त्यामुळे त्यांनीच हा प्रकल्प रद्द करावा, अशी प्रकल्पविरोधकांची मागणी असून या मुद्दय़ावर सेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. तरीही २०१९च्या निवडणुकांवर डोळा ठेवत सेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत ‘मान ना मान, मैं तेरा मेहमान’ या उक्तीनुसार आंदोलकांबरोबर उभे राहिले आहेत.

दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही. पण राजापूर तालुक्यातील पक्षाचे युवा नेते अजित यशवंतराव आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे गेल्या नोव्हेंबरात प्रकल्पविरोधकांनी येथील जमिनीची मोजणी रोखल्यावर त्यांनी धावपळ करून प्रकल्पविरोधी सदस्यांची मुबईत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी गाठ घालून दिली. मग ताईंनीही आपल्या शैलीत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर झापून आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. अराम्को कंपनीबरोबर करार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली त्या वेळी येत्या १० मे रोजी नाणार परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कोकणचे ‘भाग्यविधाता’ भाजपचे खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पूर्वाश्रमीचे संस्थापक अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी लीलया पार पाडणारे नारायण राणे यांनी यापूर्वीच नाणार परिसरात जाहीर सभा घेऊन प्रकल्पविरोधात आरोळी ठोकली आहे, तर एकेकाळी त्यांच्याशी जवळीक असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हेही, या शर्यतीत आपण मागे राहायला नको म्हणून, गेल्या जानेवारीत येथे चक्कर मारून गेले.    या तमाम विरोधी पक्षांच्या वरातीत मागे राहिलेले काँग्रेस पक्षाचे दुबळे घोडेही आता पुढेसरसावले असून पक्षाचे खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ गेले दोन दिवस या परिसरात गावपातळीवर प्रकल्पग्रस्तांना भेटून त्यांच्या गाऱ्हाण्याची दखल घेत आहे.

नाणारच्या मुद्दय़ावर हे सर्व विरोधी पक्ष एकदम एवढे संवेदनशील बनण्यामागे येऊ घातलेल्या लोकसभा-विधानसभा हे एक महत्त्वाचे कारण आहेच, त्याचबरोबर संधी मिळेल तेव्हा भाजपला अडचणीत आणण्याच्या राजकीय डावपेचाचाही हा एक भाग आहे. पण तसे करताना प्रत्येकाचा सवता सुभा आहे आणि अन्य तिघांनी सेनेला लक्ष्य केले आहे. अशा परिस्थितीत प्रकल्पाला विरोध, ही शिवसेनेची गरज असली तरी उद्या सत्ताधारी भाजपने हा प्रकल्प रेटलाच तर त्या वेळी निर्माण होणारी कोटय़वधी रुपयांची कंत्राटे मिळवण्यात भाजपसह सर्व पक्षांचे नेते-कार्यकर्ते आघाडीवर असल्यास आश्चर्य वाटू नये. एन्रॉन, जिंदाल, जैतापूर या प्रत्येक प्रकल्पाबाबत हे घडले आहे. नाणारच्या तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी म्हणूनच सर्वाची जणू शर्यत लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:14 am

Web Title: all opposition parties oppose nanar project in konkan region
Next Stories
1 आखाडा, आकडे आणि अस्वस्थता
2 मगरीने केलेल्या हल्ल्यात सांगलीत मुलगा बेपत्ता
3 कोणतीच संस्था शुद्ध ठेवू देणार नाही असा काही लोकांचा पण
Just Now!
X