औरंगाबाद आयुक्तालयाचे विभाजन होऊन दुसऱ्या महसूल आयुक्तालयाचे मुख्यालय लातूर येथेच केले जावे, या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने मंगळवारी गांधी चौकात सर्वपक्षीयांनी धरणे आंदोलन केले.
औसा, अहमदपूर, जळकोटसह जिल्हय़ातील सर्व तालुक्यात सोमवारी या मागणीसाठी धरणे आंदोलन केल्यानंतर मंगळवारी गांधी चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. अॅड. उदय गवारे, अॅड. मनोहरराव गोमारे, ताजोद्दीनबाबा, डी. एन. शेळके, श्रीकांत सूर्यवंशी, बबन शेळके, अॅड. अण्णाराव पाटील, अशोक गोिवदपूरकर, मुर्गाप्पा खुमसे, कॉ. विश्वंभर भोसले, मोईज शेख, राजपाल भंडे, अॅड. भारत साबदे, प्रा. ओमप्रकाश होळीकर आदींनी सहभाग दिला. जिल्हा वकील मंडळातर्फे न्यायालयाच्या इमारतीपासून गांधी चौकापर्यंत रॅली काढून धरणे आंदोलनात सहभाग घेण्यात आला. आंदोलनात वकिलांची संख्या लक्षणीय होती. राज्य सरकारने महसूल आयुक्तालयाच्या विभाजनासाठी योग्य अभ्यास करण्यास मंत्रिमंडळ गट निर्माण करावा व अभ्यासाअंती निर्णय घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.