साताऱ्यात शनिवारी समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्कावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी  शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची निमंत्रणे धाडली असून, ते उपस्थित राहणार आहेत.

उदयनराजे भोसले यांचा एक्कावन्नावा वाढदिवस येत्या शनिवारी (दि. २४) साजरा होत आहे. त्याच दिवशी विविध विकासकामांची सुरुवात होणार आहे. त्यात साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविणे, भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर उभारणी प्रारंभ आणि पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांबरोबरच एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला किमान लाखभर समर्थक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. परंतु या कार्यक्रमास एकाच वेळी व्यासपीठावर विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

राजकीय आखाडय़ात एकमेकांचे शत्रू किंवा मित्र असलेले हे सर्वच पक्षातील नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाकडे सगळय़ांचेच लक्ष लागलेले आहे. या शक्तिप्रदर्शनातून आगामी निवडणुकीसाठी उदयनराजे आपली राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. तसेच ते आपल्यासाठी सर्वच पक्षांचे दरवाजे खुले असल्याचाही संदेश देत असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारही उपस्थित राहणार

गेल्या अनेक वर्षांपासून उदयनराजे आणि अजित पवार यांच्यातील ‘संवाद’ हा राज्यभर गाजतो आहे. या पाश्र्वभूमीवर उदयनराजे यांनी स्वत: अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणानंतर तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All parties leaders to attend udayanraje bhosale birthday event
First published on: 23-02-2018 at 01:13 IST