कर्जत येथे ६ तास सर्वपक्षीय रास्ता रोको
राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे थरकाप अडवणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे हालहाल करून खून करण्यात आला तरीही राज्याचे मुख्यमंत्री यावर गप्प आहेत. राज्य सरकार झोपी गेले आहे, त्यांना जागे करावे लागेल. येत्या सोमवारी सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर जाब विचारू, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनी शनिवारी येथे दिला.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरातील शिवछत्रपती चौकात शनिवारी निर्धार आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जत-नगर रस्त्यावर तब्बल सहा तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. कर्जतमध्ये शनिवारी दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला. कुळधरण, खेड येथे बंद पाळण्यात आला व सुपे येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, यांच्यासह सर्व राजकीय पक्ष व विविध संघटनांनी संयुक्त आंदोलन केले. खासदार दिलीप गांधी, आमदार दिलीप वळसे आमदार राहुल जगताप, राजेश परकाळे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा परीषदेचे सदस्य प्रविण घुले, राजेंद्र फाळके, राजेद्र गुंड, कैलास शेवाळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
वळसे म्हणाले, कोपर्डीतील घटना मनाला वेदना देणारी आहे. घटनेला तीन दिवस झाले तरी पोलीस एकाच आरोपीला अटक करू शकले. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व वरिष्ठ पेालीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देण्याची गरज होती. एसआयटी कडे हे प्रकरण तपासाठी द्यावे, ही नागरिकांची मागणी योग्य आहे. या प्रकरणी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवून संबधीत कुटुंबांना न्याय मिळवून देऊ.
गांधी म्हणाले, हे अमानवी आणि राक्षसी कृत्य आहे. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना अटक करावी, यासाठी आपण नागरिकांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी आहोत. आमदार राहुल जगताप, राजेश परकाळे, नामदेव राऊत, राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, माधुरी लोंढे, मीनाक्षी सांळुके आदींची यावेळी भाषणे झाली. जिल्हाधिकारी आनिल कवडे व जिल्हा पोलीस आधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सर्व आरोपींच्या अटेकेचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल सहा तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

द्रुतगती न्यायालयाची मागणी
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी गुन्ह्य़ाचा तीव्र निषेध केला. काही आरोपी अजूनही मोकळे आहेत, ही खेदाची बाब असून तातडीने त्यांना अटक करावी व हा खटला द्रुतगती न्यायालयासमोर चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.