16 December 2017

News Flash

संधी मिळण्यापूर्वीच शत्रूवर चढाई

आक्रमण करण्याच्या उद्देशाने आलेल्या शत्रूला संधी मिळण्यापूर्वीच त्याच्यावर चढाई करायची, हा शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा

मनोज जोशी, नागपूर | Updated: March 26, 2013 2:56 AM

आक्रमण करण्याच्या उद्देशाने आलेल्या शत्रूला संधी मिळण्यापूर्वीच त्याच्यावर चढाई करायची, हा शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा भाग होता. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने विदर्भातील काँग्रेसविरोधी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करण्यापूर्वीच त्यावर हक्क करण्यासाठी विदर्भव्यापी दौरे करून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याच रणनीतीचा प्रत्यय आणून दिला आहे.
पुढील वर्षीच्या निवडणुकीची तयारी म्हणून राज ठाकरे यांनी राज्यभर जाहीर सभांचा धडाका लावला आहे. निवडणुकीला वेळ असला तरी या सभांमधील भाषणांत ते मांडत असलेल्या मुद्दय़ांची सर्वत्र चर्चा होते आणि त्यामुळे वातावरणनिर्मिती होण्यास मदत होत आहे. भाषणांचे मुद्दे ताजे असल्यामुळे संबंधित त्याची दखल घेतात आणि राज ठाकरे यांचा उद्देश सफल होतो, असे सध्याचे चित्र आहे. याच मालिकेत त्यांचा विदर्भ दौरा संपन्न झाला आहे.
राज ठाकरे यांनी १५ ते २४ मार्च या कालावधीत चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. मध्येच प्रकृतीचा त्रास जाणवला, तेव्हा त्यांनी नागपूर व भंडारा येथील बैठका रद्द केल्या, पण उरलेला दौरा मात्र रद्द केला नाही. या दौऱ्यात पूर्व विदर्भाऐवजी पश्चिम विदर्भावर भर देण्यात आला, हे लक्षणीय आहे.
विदर्भाच्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी सभांवर भर न देता पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठका आयोजित करण्यास प्राधान्य दिले. याचे प्रमुख कारण म्हणजे, मनसे हा पक्ष अद्याप विदर्भातील कुठल्याही निवडणुकीत दखलपात्र अस्तित्व दाखवू शकलेला नाही. मनसेवर मुंबई-पुणे, ठाणे व नाशिकपुरता मर्यादित असलेला पक्ष असा शिक्का बसू द्यायचा नसेल, तर हे चित्र पुसणे आवश्यक आहे. याच वेळी विदर्भात पक्ष संघटनेच्या ताकदीचा अंदाज नसल्यामुळे जाहीर सभांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर त्यातून जाणारा संदेश पक्षाला परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे राज ठाकरे यांनी फक्त अमरावती येथे सभा घेतली. विदर्भात एकमेव सभा झाल्यामुळे तिला साहजिकच प्रचंड प्रतिसाद मिळाला. विदर्भातले ऊन सोसले नाही म्हणून प्रकृती बिघडली का, असा प्रश्न त्यांना कुणीतरी विचारला, तेव्हा ‘मी कित्येक वर्षांपासून येथे येतो आहे आणि इथल्या उन्हाची मला सवय आहे,’ असे उत्तर द्यायला ते विसरले नाहीत.
पश्चिम विदर्भात सध्या अनेक औष्णिक वीज प्रकल्प येऊ घातलेले आहेत. या प्रकल्पांसाठी फार मोठय़ा प्रमाणावर पाणी लागणार आहे. आधीच महत्त्वाचे सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे त्यांचा खर्च वाढणे आणि आहे त्या प्रकल्पांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी न मिळणे हा या भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तोच नेमका राज ठाकरे यांनी उचलून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने हे प्रकल्प आणल्यामुळे ते विरोधात बोलू शकत नाहीत. भाजप आक्रमकतेत कमी पडतो आहे आणि ज्यांच्याकडून आक्रमकतेची अपेक्षा आहे, त्या शिवसेनेने हा मुद्दा उचलण्यापूर्वीच त्याला हात घालण्याचा मुत्सद्दीपणा राज यांनी दाखवला.
अशाचप्रकारे जनभावनेवर स्वार होऊन आणि काँग्रेसच्या विरोधातील मतांना साद घालून १९९० साली शिवसेनेने विशेषत: पश्चिम विदर्भात शिरकाव केला आणि पाच वर्षांत सत्तेत येण्याइतपत स्थान मिळवले; या इतिहासाचा कदाचित उद्धव ठाकरे यांना विसर पडला असला, तरी राज ठाकरे यांनी तो लक्षात ठेवून त्यातून काही शिकण्याइतके शहाणपण दाखवले आहे. राज ठाकरे यांनी उचलून धरलेल्या ‘मराठी’ मुद्दय़ावर अनेकजण टीका करत असले तरी तरुणांमधील मोठय़ा वर्गाला त्याचे आकर्षण आहे. काही तात्कालिक निमित्त मिळाले की, निवडणुकीच्या दिवसांमध्ये हिंदुत्वाचे कार्डही चालून जाते. या मुद्दय़ांचे आतापर्यंत शिवसेनेने भांडवल करून घेतले, तोच फायदा आता विदर्भात मिळविण्याकरता राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा त्यांना प्रत्यक्षात किती फायदा मिळतो याचे उत्तर मिळण्यासाठी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबावे लागणार आहे.

First Published on March 26, 2013 2:56 am

Web Title: all party caution over raj thackeray tactic
टॅग Raj Thackeray