केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त िहगोली शहरात येताच त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी शहर बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आठवडी बाजार असल्यामुळे मंगळवारऐवजी बुधवारी बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा व्यक्त करण्यात आला. उद्या (गुरुवारी) शहरातील गांधी चौकात सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
मुंडेंच्या निधनाचे वृत्त येताच िहगोलीत शोककळा पसरली. सर्वसामान्यांसाठी लढणारा जननायक हरपला व मराठवाडा पोरका झाला, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, खासदार राजीव सातव, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संपतराव बांगर, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, बी. डी. बांगर, वीरकुँवर अन्ना, अंकुश आहेर, मुरलीधर मुळे, सतीश सोमानी, रवि कान्हेड, गणेश बांगर, तेजकुमार झांजरी, माजी आमदार गजाननराव घुगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, तान्हाजी मुटकुळे आदी मान्यवरांनी व्यक्त केली. सेनगाव येथे मंगळवारी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. जवळाबाजार, िहगोलीतील बेलदार समाज व नवा मोंढा, समाजवादी पक्ष, औंढा नागनाथ येथील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने, वसमत, कळमनुरी आदी ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
औंढा नागनाथ येथे मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा पाळला. बुधवारी औंढा नागनाथ येथे जि.प.चे माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील, पं.स.चे उपसभापती अनिल देशमुख, जी. डी. मुळे, सरपंच वसंत मुळे, पांडुरंग नागरे आदींच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्या िहगोलीत सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.