News Flash

टोलविरोधी महामोर्चातून प्रकटला करवीरकरांचा उद्रेक

शहरातील व्यापारी दुकाने बंद करून मोर्चात सहभागी झाल्याने शहरात अघोषित बंदसदृष्य स्थिती पहावयाला मिळाली.

| July 8, 2013 07:19 am

टोल रूपातील राक्षसाची प्रतिकृती, विविध पक्षीयांचे मार्मिक अन् लक्षवेधी झेंडे-फलकांची गर्दी, टोल हटाओच्या गगनभेदी घोषणा, आयआरबी विरोधातील घोषणाबाजी अशा विविध वैशिष्टय़ांनी सामावलेल्या टोल विरोधातील विराट मोर्चाने सोमवारी जनभावनेचा उद्रेक करवीरकरांना पहायला मिळाला. या विराट मोर्चामध्ये हजारो नागरिकांसह रिक्षा, टेम्पो, लक्झरी आदी वाहनांचाही समावेश होता. शहरातील व्यापारी दुकाने बंद करून मोर्चात सहभागी झाल्याने शहरात अघोषित बंदसदृष्य स्थिती पहावयाला मिळाली.शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सहभागामुळे सहकारी कार्यालये तर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडली होती. शहरासह जिल्ह्य़ातील नागरिकांनी महामोर्चाला हजेरी लावल्याने शहरातील वाहतूक सायंकाळपर्यंत कोलमडली होती. 
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर टोल आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गेले आठवडाभर तयारी सुरू होती. आज सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागातील नागरिक गटागटाने गांधी मैदानाकडे जाताना दिसत होते. अकरा वाजण्याच्या सुमारास गांधी मैदान व परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. टोल विरोधातील घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात होत्या. दहा वाजता निघणाऱ्या मोर्चाला खऱ्या अर्थाने एक वाजता भक्कम स्वरूप प्राप्त झाले.
मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, आरपीआय, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांचे कार्यकर्ते तसेच प्रमुख नेते सहभागी झाले होते. आपापल्या पक्षाचा ध्वज कार्यकर्त्यांनी हातात घेतल्याने त्यांचे स्वतंत्र स्वरूप पहायला मिळत होते. वेगवेगळे झेंडे व निरनिराळे फलक मोर्चामध्ये सामावलेले असले तरी त्यातून विविधतेतील एकतेचा प्रत्ययही येत होता. टोलचा फटका वाहतूकदारांना बसणार असल्याने ट्रक, टेम्पो, लक्झरी, रिक्षा आदी वाहतूकदार शेकडो वाहनांसमवेत मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे मोर्चाची रांग लांबच्या लांब पसरली होती. बहुतांशी व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी व्यापार बंद करून आंदोलनात उतरल्याने शहरात बंद सदृश्य परिस्थिती जाणवत होती.
श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, प्रा.डॉ.एन.डी.पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक,आमदार के.पी.पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी प्रमुखांचा मोर्चामध्ये समावेश होता.
पारंपरिक वाद्यांच्या समवेत आंदोलकांनी टोल विरोधात नृत्याचा ठेका धरला होता. भाजपाचे ज्येष्ठ रामभाऊ चव्हाण यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी ‘देणार नाही, देणार नाही टोल कदापी देणार नाही, असे गात नृत्याचा ठेका धरल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली होती. तर शिवसेनेच्या वतीने टोल रूपातील राक्षसाची काळी कभिन्न प्रतिकृती सर्वाचेच लक्ष वेधून घेत होती. या राक्षसाचा वध करण्यासाठी आमदार क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी धनुष्यबाण घेऊन लक्ष्यवेध चालविला होता. हे अभिनव आंदोलन पाहण्यासाठी नागरिक तेथे मोठय़ा संख्येने जमले होते.
गांधी मैदानातून निघालेला मोर्चा महाव्दार रोड, महापालिका, दसरा चौक, बसंत-बहार चित्रमंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे आयआरबी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टोल हटाओच्या विरोधातील घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या. विशेष म्हणजे शासकीय अधिकारी व शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांची संघटना असलेली सुटा यांचे सदस्य, व्यापारी आदी प्रतिष्ठित नागरिकही जोरदार घोषणाबाजी करीत होते. शासकीय अधिकारी व कर्मचारी मोर्चात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज थंडावले होते. पुरूषांच्या बरोबरीनेच मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या महिलांनीही टोल आकारणीबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेत शालेय विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात होती. विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मोर्चातील हजारो नागरिकांचा सहभाग लक्षणीय असला तरी आपापला गट घेऊन आंदोलक सहभागी झाल्याने प्रचंड लांबीच्या मोर्चात अनेकदा तुटकपणाही जाणवत होता. मोर्चाचा मार्ग व जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 7:19 am

Web Title: all party rally against toll in kolhapur
Next Stories
1 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन
2 धोतराच्या पायघडय़ा घाली परीट.. वडार बंधू ओढी रथ माउलीचा!
3 आता पवनचक्क्या पर्यावरणवाद्यांच्या रडारवर
Just Now!
X